सातारा- फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी उद्धवस्त झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणमधील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्रामीण भागातील प्रचार सभेत केला आहे. तसेच सरकारकडून एका बाजूला जातीय ध्रुवीकरण सुरू आहे, तर दुसरीकडे अर्थिक मंदीमुळे जनता मेटाकुटीला आहे. त्यामुळे जनतेने परिवर्तन करून सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा - धक्कादायक..! जन्मदात्या पित्याकडून दोन मुलांची हत्या
'जनतेच्या सुख-दु:खाशी देणे-घेणे नसणार्या डॉ. अतुल भोसले यांना फक्त आमदार व्हायचे आहे. पैशाच्या जोरावर आमदारकी मिळविण्याचा त्यांचा डाव जनतेने दोन वेळा हाणून पाडला आहे. मागील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता पुन्हा तिसर्यांदा ते भाजपसारख्या जातीयवादी पक्षाचे उमेदवार म्हणून जनतेसमोर आले आहेत. त्यांना कराड दक्षिणच्या विकासासाठी नव्हे, तर आपल्या संस्था मोठ्या करण्यासाठी आणि संस्थांमधून मिळणारा पैसा लपवण्यासाठी आमदारकी आणि सत्ता हवी आहे. अशा संधीसाधूंना जनतेने थारा देऊ नये,' असे आवाहन चव्हाण यांनी केले. 'तीनच महिन्यात सातारा लोकसभेची पोटनिवडणूक का लादली गेली, याचे उत्तर देणे कठीण आहे. पोटनिवडणुकीमुळे जनतेवर 22 कोटींचा अकारण बोजा पडणार आहे. जनतेने याचाही विचार करून सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील महाआघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना विजयी करावे,' असे ते म्हणाले.
हेही वाचा - ...तर साताऱ्याला मंत्री पद देऊ - मुख्यमंत्री