सातारा- पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ते दुसर्यांदा आमदार झालेले पृथ्वीराज चव्हाण आणि दोनवेळा खासदार, सिक्कीमचे राज्यपाल ते पुन्हा तिसर्यांदा खासदार झालेले श्रीनिवास पाटील या पाटण तालुक्यातील सुपूत्रांचाच सध्या जिल्हाभर बोलबाला आहे. पक्ष वेगळे असले, तरी एकाच तालुक्यातील असलेल्या या नेत्यांच्या कारकिर्दीची अनेक कारणाने सध्या सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
आ. चव्हाण हे 2014 पासून सतत मोदींच्या धोरणांवर हल्लाबोल करत आहेत. म्हणून, कराड दक्षिणच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपने मोठी फिल्डींग लावली होती. त्याचाच एक भाग म्हणून मोदींनी सातार्यात आणि अमित शहांनी कराडमध्ये सभा घेतली. इतके करूनही विधानसभा निवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाणांनीच बाजी मारली. तर, दुसरीकडे श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर सलग तीनवेळा निवडून आलेल्या छ. उदयनराजे भोसले यांना पोटनिवडणुकीत चितपट केले. उदयनराजेंना पराभूत केल्यामुळे श्रीनिवास पाटील यांच्या लोकप्रियतेची राज्यभर चर्चा होते आहे.
पाटण तालुक्यातील कुंभारगाव हे पृथ्वीराज चव्हाण यांचे, तर मारूल हवेली हे श्रीनिवास पाटील यांचे मूळ गाव. पाटण तालुक्याने स्व. आनंदराव चव्हाण, प्रेमलाकाकी चव्हाण, लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई, असे दिग्गज नेते राज्याला आणि देशालाही दिले. काँग्रेस दुभंगल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यामुळे 1999च्या लोकसभा निवडणुकीत पाटण तालुक्याचे हे सुपुत्र एकमेकांविरोधात उभे होते. त्या निवडणुकीत कराड लोकसभा मतदार संघातील जनतेने पवारांचे जिवलग मित्र म्हणून राजकारणात नवख्या असणार्या श्रीनिवास पाटील यांना निवडून दिले आणि पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले. चव्हाण यांचा पराभव झाला होता, तरी काँग्रेसने 2004 मध्ये त्यांना पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री केले. केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर कराडमध्ये त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्या मिरवणुकीत खा. श्रीनिवास पाटीलही सहभागी होते.