सातारा : ऐन धुळवडीच्या सणादिवशीच सातार्यातील पोवई नाक्यावर तणाव निर्माण झाला. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराशेजारील इमारतीवर खासदार उदयनराजे भोसले यांचे काढले जाणारे चित्र हे या तणावाचे कारण बनले. इमारतीच्या भिंतीवर उंच ठिकाणी चित्र काढायचे होते. त्यासाठी आणलेली क्रेन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराच्या प्रवेशव्दारावर उभी करण्यास पालकमंत्र्यांच्या मुलाने हरकत घेतली होती. त्यानंतर काम बंद केले होते. मात्र, मंगळवारी पुन्हा चित्र काढण्याचे काम सुरू होताच पोलिसांनी चित्रकाराला ताब्यात घेतल्याने तणाव निर्माण झाला. सध्या पोवई नाका परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
तीन दिवसांपुर्वी चित्र काढण्याची तयारी : सातार्यातील राहुल पाटोळे हे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आहेत. त्यांनी उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त तालीम संघाजवळील एका इमारतीच्या भिंतीवर मोठे चित्र रेखाटले आहे. त्याच धर्तीवर पोवई नाक्यावरील खासदार उदयनराजे भोसले यांच्या मालकीच्या इमारतीच्या भिंतीवर त्यांनी उदयनराजेंचे चित्र काढण्याची तयारी सुरू केली होती.
पालकमंत्र्यांच्या मुलाची हरकत :पोवई नाक्यावरील मंत्री शंभूराज देसाईंच्या घराशेजारील इमारतीच्या भिंतीवर चित्र काढण्यात येणार होते. त्यासाठी क्रेनच्या साह्याने भिंत रंगविण्यात आली आणि शनिवारी छायाचित्र काढण्यास सुरूवात केली. परंतु, चित्र काढण्यासाठी आणलेली क्रेन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराच्या प्रवेशव्दारावर उभी करण्यात येत होती. त्याला पालकमंत्र्यांचे पुत्र यशराज देसाई यांनी हरकत घेतली. शंभूराज देसाई आल्यानंतर चर्चा करुन पुढील कारवाई करा, असे यशराज यांनी संबंधितांना सांगितले.
कार्यकर्त्यांना पोलिसांनी हटकले : या घटनेनंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना हटकण्यात आले. शनिवारी रात्री पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, संजय पतंगे हे पोवई नाक्यावर दाखल झाले. त्यांच्यासोबत मोठा फौजफाटा होता. या संपुर्ण प्रकाराची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांना काही जणांनी दिली. त्यामुळे पोलीस अलर्ट मोडवर आले. उदयनराजे समर्थकांवर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवले.