सातारा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्यूकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. सातारा जिल्ह्यातही या आजाराने तिघांचे बळी घेतले आहेत. सध्या 25 रुग्ण उपचार घेत आहेत. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
साताऱ्यात म्यूकरमायकोसिसचा उद्रेक; 28 रुग्ण, 3 बळी '28 पैकी 3 मृत्यू'
'सातारा जिल्ह्यात म्यूकरमायकोसिसचे 28 रुग्ण आढळून आले. त्यापैकी 8 रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या 28 पैकी 3 रुग्णांचा म्यूकरमायकोसिसने बळी घेतला आहे', असे सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
बायोप्सीद्वारे निदान
'म्यूकरमायकोसिससाठी आवश्यक असणाऱ्या इंजेक्शनचा पुरवठा जिल्हा रुग्णालयकडे पुरेसा होत आहे. कोरोना आणि मधुमेही रुग्णांना हा आजार होत आहे. कोविडवरील उपचारात ज्यांना स्टेरॉइडचा वापर करण्यात आला. त्यांनीही काळजी घेण्याची गरज आहे. लिव्हर किंवा किडनी ट्रान्सप्लांट रुग्णांमध्ये हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. यात डोळे, नाक, कानामध्ये इन्फेक्शन होते. डोळ्यांची लाली वाढणे, डोळ्याला सूज येणे, शिंका येणे, अर्धशिशी होणे, ताप येणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. याच्या निदानासाठी आपल्याला बायोप्सी करावी लागते', असेही डॉ. सुभाष चव्हाण यांनी म्हटले.
'लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णात घट'
'गेल्या तीन आठवड्याची आकडेवारी पाहता सातारा जिल्ह्यामध्ये दररोज साधारण 2200 ते 2500 रुग्ण आढळून येत होते. आता त्यामध्ये घट झाली आहे. आता 1700 ते 1900 पर्यंत रुग्ण आढळत आहेत. बाधितांचे प्रमाणही 37 टक्क्यांवरून घटून 27 ते 32 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. लॉकडाऊनमुळे बाधितांच्या प्रमाणात घट दिसत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक केल्यास कोरोना रुग्णसंखेत मोठी घट पाहायला मिळेल', असा विश्वासही डॉ. चव्हाण यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -तौक्ते चक्रीवादळाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडवले