सातारा- दहिवडी ग्रामीण रुग्णालयात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अपघाती रुग्ण दाखल करण्यात आला. मात्र याठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे रुग्ण स्ट्रेचरवर तडफडत असल्याचे समोर आले आहे. काही वेळाने ऑन कॉल डॉक्टर येऊन उपचार करून रुग्ण सातारला उपचारासाठी हलवण्यात आला. मात्र, दहिवडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एल. जगताप ऑन ड्युटी असतानाही उपस्थित नसल्याने याठिकाणी नागरिकांच्या जमावाचा रोष पाहायला मिळाला.
रुग्णालयात रुग्ण तडफडत; ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकारी मात्र फिरायला, साताऱयातील दहिवडीतला प्रकार काही वेळातच पोलीस प्रशासन तातडीने या ठिकाणी दाखल होऊन सर्व नागरिकांना शांततेचे आवाहन केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णांना तपासणीसाठी डॉक्टर या ठिकाणी उपस्थित नसतात, असे प्रकार कायमच घडत असल्याने नागरिकांनी गोंधळ चालूच ठेवला होता.
याबद्दल अधिक माहिती अशी, की गोंदवल येथे रात्री झालेल्या अपघातात गणेश हरगुडे (वय ३५ रा.गोंदवले ता.माण) जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले. मात्र, याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एल. जगताप उपस्थित नसल्यामुळे नागरिक व रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचार्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. नागरिकांनी वैद्यकीय अधिकारी ऑन ड्युटी असतानाही कुठे जातात? असा प्रश्न विचारला असता काही कर्मचाऱ्यांनी ते फिरायला गेलेत तर काही कर्मचाऱ्यांनी जेवायला गेल्याचे कारण दिले.
रुग्ण हॉस्पिटलमधून रुग्णवाहिकेत घेऊन जातानासुद्धा नागरिकांनी मदत केली. मात्र, या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱयांनी त्यांना स्ट्रेचरसुद्धा दिला नाही. त्यामुळे रुग्णाला बेडशीटवरती उचलून रुग्णवाहिकेत ठेवले गेले. असाच प्रकार मागील महिन्यातच दोन ते तीन वेळा घडला होता. त्यावेळी देखील डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे काही रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. याबाबत अनेकांनी आंदोलन केले तसेच वरिष्ठांना अर्ज केले आहेत. मात्र, त्यावर ठोस उपाय अजूनही निघाला नाही. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी त्यांच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ केल्याचे गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक त्रासाला सामोरे जाव लागत आहे. यावरती प्रशासनाने गंभीर दखल घेऊन वैद्यकीय अधिकारी तसेच याठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रुग्णांचे नातेवाईक तसेच नागरिक करत आहेत.
मागील महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी अपघातात जखमी असणाऱ्या रुग्णाला त्यांच्या खासगी वाहनातून घेऊन आले असता त्याच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. त्यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात डॉक्टरच्या भोंगळ कारभाराविरोधात पाटील यांनी ठिय्या आंदोलन केले होते. त्यांच्यावर देखील आचारसंहितेचा भंग म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार देऊन त्यांनादेखील चौकशीला सामोरे जाण्यास भाग पाडल्याचे पाटील यांनी सांगितले.
त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाविरोधात आवाज उठवणाऱयाची मुस्कटदाबी रुग्णालय प्रशासन करत असल्याचा आरोप नागरिक तसेच लोकप्रतिनिधी करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. अन्यथा रुग्णांना आपले जीव गमवावा लागेलच तसेच रुग्णाच्या नातेवाईकांना ही याचा त्रास सहन करावा लागणार आहे.