महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाप स्मशानात जळत होता; अन् मुले-मुली... - old man died

यशोधन निवारा केंद्रमध्ये १ वर्षाआधी आलेल्या एका आजोबांचे ह्रदयविकाराने निधन झाले. याबाबत त्यांच्या मुलांना कळविण्यात आले. मात्र, मुलांनी विविध कारणे सांगून अंत्यविधीला यायला चक्क नकार दिला.

बाप स्मशानात जळत होता

By

Published : Nov 18, 2019, 9:57 AM IST

सातारा -जीवनात येऊन माणूस काय कमावतो आणि शेवटी जाताना सोबत काय घेऊन जातो. कोण आपलं आहे हे वेळेप्रसंगी जो धावून येतो, त्यावरून समजते. अशीच एक घटना तालुक्यातील (वेळे) यशोधन निवारा केंद्रामध्ये घडली आहे. निवारा केंद्रात वडिलाचे निधन झाल्यानंतर त्यांच्या ४ मुलांना आणि २ मुलींना कळविण्यात आले. पोरांची वाट बघत अखेर एकटाच स्मशानात जळत बाप सरणावर गेला. मात्र, मुले शेवटपर्यंत आलीच नाहीत.

वाई राजधानी साताऱ्यातील गोडोली परिसरामध्ये वर्षभरापूर्वी नव्वदीतील एक गृहस्थ फिरत होते. त्यांच्या अंगावर मळकट कपडे आणि रात्रंदिवस रस्त्यावरच त्यांचा मुक्काम असायचा. याची माहिती वाई येथील (वेळे) यशोधन निवारा केंद्राचे अध्यक्ष रवी बोडके यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी त्या आजोबांना आपल्या निवारा केंद्रामध्ये आश्रय दिला. गेल्या १ वर्षापासून त्या आजोबांचे आणि रवी बोडके यांचे अनोखे नाते निर्माण झाले होते. निवारा केंद्रामध्ये सर्वजण त्यांना बाबा म्हणूनच हाक मारत होते. निवांत वेळी माळ जपणे, पोती वाचणे, ज्ञानेश्वरी आणि गीता वाचणे असे छंद ते बाळगत. त्यांच्या येण्याने निवारा केंद्रामधील इतर वृद्धांना त्यांचा आधार वाटत होता.

आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी मुंबईमध्ये मील कामगार म्हणून घालवले होते. त्यांना ४ मुले व २ मुली आहेत. हयातीत असताना त्यांनी आपल्या प्रेमापोटी मुलांना स्वत:चे घर, शेती अशी सर्व संपत्ती नावावर करून दिली होती. मात्र, मुलांनी उतार वयात वडिलांचा सांभाळ करण्यास पाठ फिरवली. ज्यांच्यासाठी आयुष्य खर्ची घातलं, सांसर उभा केला त्यांनीच शेवटचा आधार हिरावून घेतला.

हेही वाचा - द्राक्ष बागायतदारांच्या व्यथा; सातबारा तरी कोरा करा, नाहीतर कर्ज माफी द्या

असे असतानाही हा सारा कटू अनुभव विसरून ते निवारा केंद्रामध्ये आपले उर्वरित आयुष्य कंठत होते. मात्र, नियतीला हे मान्य नसावे. त्यांच्या छातीमध्ये अचानक वेदना होऊ लागल्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांनी ‘मला माझ्या मुलांना भेटायचे आहे’, अशी इच्छा रवी बोडके यांच्याजवळ बोलून दाखवली. बोडके यांनी प्रयत्नांची पराकष्टा करून मुलांचे मोबाईल क्रमांक मिळविले. पण प्रत्येक मुलाकडून आणि मुलीकडून आत्ता वेळच नाही. परत फोन करू नका, अशी उत्तरे बोडके यांना मिळाली.

रवी बोडके हे ऐकून आवाक् झाले. पण बाबांना काय सांगायचं, असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला. उपचार सुरू असताना आजोबांची काळजी घेण्याबरोबरच रवी बोडके त्यांना आधार देत होते. मात्र, त्यांना पुन्हा ह्रदयविकाराचा झटका आला अन् आजोबांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. मनावर दगड ठेवून जड पावलांनी बोडके जिल्हा शासकीय रुग्णालयात गेले. आजोबांचा चेहरा पाहून बोडके यांचे मन गहिवरून आले.

हेही वाचा - वांग नदीत वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला

पुन्हा एकदा त्यांच्या मुलांना सांगण्याची वेळ रवी बोडके यांच्यावर आली. परत एकदा त्यांच्या मोठ्या मुलाला बोडके यांनी फोन केला. ‘तुमचे वडील गेले,’ असे त्याला सांगितले. यावर तो मुलगा म्हणाला, ‘मग मी काय करू, मी तुम्हाला सांभाळायला सांगितले होते का? तुमचं तुम्ही बघा, नाहीतर बेवारसपणे सोडा. मी येणार नाही आणि फोन पण करू नका,’ हे ऐकून बोडके यांना पुन्हा एकदा धक्काच बसला. पण बोडके यांनी हार मानली नाही. आता आपण यांचा मुलगा आहे, हे मानून बोडके यांनी सर्व कागदोपत्री शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या. त्यानंतर त्यांनी बाबांवर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. जड अंत:करणाने जवळच्याच स्मशानभूमीमध्ये विधिवत सर्व अंत्यसंस्कार पूर्ण करून डोळ्याच्या कडा पुसत बोडके यांनी त्यांना अग्नी दिला. ज्या मुलांना जन्माला घातले, वाढवले त्यांची वाट पाहण्यातच जीव गेला आणि शेवटी बाप वाट पाहतच सरणावरती गेला. शेवटी आपल्या बापाच्या अग्नीला पोरं आले ना पोरी आल्या. ज्या बापाने लेकरांच्या आयुष्यासाठी सगळे जीवन खर्ची घातले, त्यांना साधा अग्नी देण्यासही मुलांकडे वेळ नव्हता..!

खात्यावर सव्वा लाख

आजोबांचे निधन झाल्यानंतर निवारा केंद्रामध्ये असलेली त्यांची छोटीशी पेटी उघडली. तेव्हा त्यामध्ये त्यांना एका बँकेचे पासबुक सापडले. त्यांच्या खात्यावर तब्बल सव्वा लाखांची रक्कम असल्याचे समोर आले. मुलांना याची माहिती कानोकानी मिळाल्यानंतर त्यांनी बोडके यांच्याकडे बँक पासबुक आणि इतर साहित्याची मागणी केली आहे. मात्र, बोडके यांनी अद्याप त्यांना पासबुक दिले नाही. समाजात अशा प्रकारचेही लोक असतात, वेळ आणि पैसा एकाच गोष्ट शिकवून जाते की आपले असणारे शेवटी पैसा बघतात.

हेही वाचा -कराड पंचायत समितीमधील मानापमान नाट्य थांबेना; यशवंतरावांचा अवमान होण्याचा धोका

ABOUT THE AUTHOR

...view details