सातारा- देशाच्या सीमेवर लढणाऱ्या फौजीने आपल्या लग्नाचा थाटमाट कमी करून कोरोनाशी दोन हात करणाऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला. फौजी लहू व प्रज्ञा या नवदांपत्याने मुख्यमंत्री साहाय्यता निधी म्हणून 25 हजारांच्या रकमेसह संपूर्ण गावाला व पोलीस कर्मचाऱ्यांना शिधावाटप करून कोरोना युद्धात "हम तुम्हारे साथ है'चा नारा दिला.
माणमधील उकिर्डे येथील बाळू इंदलकर यांचे चिरंजीव लहू आणि गोंदवले बुद्रुक येथील अनिल भोसले यांची कन्या प्रज्ञा यांचा गेल्या काही महिन्यांपूर्वी विवाह निश्चित झाला होता. त्यानंतर मात्र, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन झाला आणि लग्नाचा बारही 'लॉक' झाला. परंतु या आपत्तीचा समाजकार्यातून लाभ घेण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबीयांकडून घेण्यात आला.
नवरदेव लहू हा सीमेवरील युद्धात दोन हात करत असल्याने कोरोना युद्धात लढणाऱ्यांसाठी दंड थोपडले. त्यातून विवाहाचा खर्च टाळून या आपत्तीकाळाशी लढण्यासाठी शासनाला मदतीचा निर्णय घेतला. लोकांच्या सुरक्षेसाठी अखंडितपणे ड्युटी बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना, तसेच संपूर्ण उकिर्डे गावकऱ्यांना अन्नधान्याचे वाटप करण्याचे वधू-वर पक्षांनी ठरवले. नुकताच गोंदवले बुद्रुक येथे छोटेखानी हा विवाह झाला.
शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून झालेल्या या सोहळ्यासाठी दहिवडीचे न्यायाधीश अमितसिंह मोहने, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ व नायब तहसीलदार विलास करे तसेच पत्रकार उपस्थित होते. या ठिकाणी वधूवरांच्या हस्ते 25 हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी सुपूर्त करण्यात आली. तसेच पोलिसांनाही गरजेच्या शंभरहून अधिक किटचे वाटप करण्यात आले. लग्नाप्रित्यर्थ उकिर्डे येथील गावकऱ्यांना जीवनावश्यक अन्नधान्याचे घरोघरी वाटप करण्यात आले. त्यामुळे देशाची सीमा सांभाळणाऱ्या फौजीने कोरोना युद्धासाठी दिलेल्या बळाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तयार आहोतच, परंतु सध्याच्या आपत्तीतही देशहिताला हातभार लावणे माझे कर्तव्यच आहे. याच उद्देशाने लग्नातील खर्च टाळून आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला, असे नवरदेव लहू इंदलकर याने सांगितले.