सातारा: सध्या शेतकरी कुठे शेतात दिसतोय का? असा सवाल करत 'अगोदर आभाळ बघायचं.. वारं बघायचं.. मग नांगरायचं असतं, असे खा. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. साताऱ्यातील कराडमध्ये होणाऱ्या शिवपुत्र संभाजी महानाट्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच अमोल कोल्हेंनी मोदींचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी तुमचे सभागृहात कौतुक केल्याकडे लक्ष वेधून आता कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार, असा प्रश्नावर विचारला असता खासदार कोल्हे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी माझे कौतुक केले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचे सांगून डॉ. कोल्हे यांनी देखील मोदींचे कौतुक केले. त्यामुळे आता अमोल कोल्हे राष्ट्रवादीत राहणार की भाजपमध्ये जाणार? या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
राष्ट्रवादीमुळे खासदार झालो:माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला राष्ट्रवादीमुळे खासदार होता आले, असे अमोल कोल्हेंनी सांगितले. खासदार झाल्यानंतर शरद पवारांचा सहवास लाभला. तब्बल साडेपाच दशके ते राज्याच्या व देशाच्या राजकारणात सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबर काम करताना मला बरेच काही शिकायला मिळत आहे. त्यांच्याकडे मोठी ऊर्जा आहे, असेही कोल्हे म्हणाले. तसेच डॉ. कोल्हे म्हणाले की, शाश्वत विकासाकडे जाणाऱ्या राजकारणावर आपला विश्वास आहे. मी शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतो. चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. सुमारे 30 हजार कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्गांचे काम सध्या माझ्या मतदारसंघात होत आहे. सात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स होत आहेत.