सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग व सर्व्हीस रोडची 15 दिवसात दुरुस्ती न झाल्यास आनेवाडी येथे टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाबाबत असमाधान व्यक्त करून न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे 'टोल विरोधी सातारी जनता' च्या सदस्यांनी सांगितले.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट आहे. या रस्त्याच्या सहापदरी रुंदीकरणासह इतर सुविधांची सर्व कामे होईपर्यंत टोल न देण्याची जाहीर भूमिका सातारकरांनी घेतली आहे.
टोलविरोधी लढ्यासाठी 'टोल विरोधी सातारी जनता' नामक सामाजिक समूहाने जबाबदारी घेतली आहे. महामार्गाच्या दुरवस्थेबाबत सातारकरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तीव्र असंतोष आहे. समाजमाध्यमातून या विषयावर पडसाद उमटत असल्याने एकप्रकारे जनरेटा तयार झाला आहे. त्यातच लोकप्रतिनिधींनीही हे आंदोलन उचलून धरल्याने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच रिलायन्स आणि अन्य संबंधित जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
शिवेंद्रसिंहराजे यांनी महामार्ग, सर्व्हीस रोडवरील खड्डे भरणार आहात की नाही? असा सवाल करून अधिकार्यांना धारेवर धरले. तसेच काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली बंद करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पंधरा दिवसांत काम न झाल्यास सोळाव्या दिवशी आनेवाडी येथे टोलबंद आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला. तसेच जोपर्यंत काम होत नाही; तोपर्यंत टोल वसुली बंद करा, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी सुनावले.
बैठकीला उपस्थित अधिकार्यांनी येत्या 15 दिवसांत महामार्ग आणि सर्व्हीस रोडवरील खड्डे कार्पेट करून भरण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, महामार्गावरील इतर सोयी सुविधांसाठी वेळ लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.