सातारा-येत्या काही दिवसांत राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. प्रकरणाबाबत बोलतानाकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार आहेत. ते माण तालुक्यातील म्हसवडला माध्यमांशी बोलत होते.
राज्यात सध्या फसवणूक सरकार आहे. या सरकारकडून जनतेची फसवणूक सुरू आहे. माण -खटाव तालुक्याने नेहमीच काँग्रेस पक्षाची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी दुष्काळी माण तालुक्याला भरघोस निधी दिला होता. यामुळेच माण तालुक्यातील सर्व सिंचन योजना मार्गी लागल्या असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
कार्यकर्ता हीच कॉंग्रेसची ताकद-माण-खटावचे लोकप्रतिनिधी सध्या कोणत्या पक्षात आहेत, याचे सामान्य जनतेला काहीही देणे-घेणे नाही. माणदेशची जनता कालही कॉंग्रेस सोबत होती. आजही आहे अन् उद्याही राहील, असा टोला पटोले यांनी भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांचे नाव घेता लगावला आहे. पटोले म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्ता हीच कॉंग्रेस पक्षाची खरी ताकद आहे. त्यामुळे माण-खटावमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना आपण ताकद देणार आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत माण-खटावमध्ये कॉंग्रेसचाच आमदार निवडून येईल, असा विश्वास देखील पटोले यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीत बेबनाव नाही -राज्यातील महाविकास आघाडीमध्ये कोणताही बेबनाव नसल्याचे स्पष्ट करुन पटोले म्हणाले, महाविकास आघाडी भक्कम आहे. यापुढील सर्व निवडणुका आम्ही एकत्रीत लढून सध्याच्या राज्य सरकारला सत्तेतून खाली खेचणार आहेत. याच सरकारने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मराठा व धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. मात्र सत्ता येताच आरक्षणाचा प्रश्न लटकवत ठेवून समाजाची घोर फसवणूक केली, असा आरोप नाना पटोलेंनी केला.
स्नेहल जगतापांच्या विरोधात उमेदवार देणार-स्नेहल जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये, असे उद्धव ठाकरे यांना आम्ही सांगितले होते. तरीही त्यांना आपल्या पक्षात घेतले आहे. भविष्यात जर त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविली तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार उभा करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. यावेळी सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माण तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, डॉ. धवलसिंह मोहिते - पाटील, दाऊद मुल्ला, नीलेश काटे उपस्थित होते.