सातारा - मराठा समाजातील बहुतांश लोकांना खायला अन्न नाही. मुलांची लग्न ठरत नाहीत. किती दिवस नुसती चर्चा, चर्चा अन् चर्चाच करायची. या समाजाबाबत न्याय होत नसेल तर, पदावर राहून तरी काय उपयोग? माझी कोणत्या पक्षाशी बांधिलकी नाही तर, लोकांना मी बांधिल आहे. त्यासाठी राजीनामा द्यायची वेळ आली तर, आता तो देईन, असा उद्वेग खासदार उदयनराजे भोसले यांनी आज व्यक्त केला.
साताऱ्यात आज त्यांनी 'जलमंदिर पॅलेस ' या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर भूमिका मांडली. ते म्हणाले, राज्य शासन असो की केंद्र सरकार. आरक्षणाच्या विषयावर चर्चा करणार का? असे माध्यमे विचारतात. कोणाशी आणि कसली चर्चा करायची? कशाचा विचारविनीमय करायचा? त्यांचे त्यांना कळत नाही का? आता लोकच त्यांच्याकडे बघतील. प्रत्येक ठिकाणी राजकारण. आता राजकारण हे गजकर्ण झाल आहे. कोणावर अन्याय होत असेल तर, अॅक्शनवर रिअॅक्शन येणारच. मग मी लोकांना थोपवू शकत नाही, असे सांगतानाच, केवळ मी मराठा आहे म्हणून मी या समाजाची बाजू घेतोय, असे नाही. कोणावर अन्याय होऊ द्यायचा नाही, हा माझा स्वभाव आहे. फक्त मराठा समाज म्हणून नव्हे तर, कोणत्याही समाजावर अन्याय होत असेल तर त्या समाजाचे नेतृत्व मी करेन, असे खासदार उदयनराजे म्हणाले.
हेही वाचा -'आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी समारंभ येत्या काही दिवसात'