सातारा :शरद पवारांनी अदानींचे समर्थन केल्याच्या प्रश्नावर बोलताना 'मला पवार साहेबांकडून समजून घेतले पाहिजे', असा खोचक टोला उदयनराजेंनी लगावला. आशिया खंडात हा उद्योजक एक नंबरचा श्रीमंत, परत चौथ्या, पाचव्या क्रमांकावर गेला. याच्यापेक्षा सर्व उद्योजकांनी टाटा ग्रुपचे अनुकरण केले पाहिजे. टाटा ग्रुपने मोठ्या प्रमाणावर रोजगार तर दिलाच परंतु, हॉस्पिटल्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध केल्या. हा दृष्टिकोन सर्वांनी ठेवला पाहिजे, असे मत उदयनराजेंनी व्यक्त केले.
आम्ही पटावर पट काढतोय :कोणी ताम्रपट घेऊन आलेला नाही. सातारचा खासदार आणि सातारा-जावळीचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल, या अजित पवारांच्या वक्तव्याचा उदयनराजेंनी समाचार घेतला. अजित पवार नेमके काय बोलले मला माहित नाही. पण नेहमीप्रमाणे चांगले विचार त्यांनी लोकांना दिले असणार, असा उपरोधिक टोला उदयनराजेंनी मारला. तसेच 'आम्ही सध्या पटावर पट काढतोय', असे सांगत अजितदादांच्या ताम्रपटाच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. मी आव्हानाला भीक घालत नाही. आव्हाने कोणाची स्विकारायची हे मी ठरवतो. कोणी काहीही म्हटले तरी लोक मूर्ख नाहीत, सूज्ञ आहेत. त्यांच्यामुळेच आमदार, खासदार निवडून जातात. कोणाला निवडून द्यायचे ते लोकांनीच ठरवावे, असा टोला उदयनराजेंनी अजित पवारांना लगावला.