कराड (सातारा) - कृष्णा रुग्णालयातून उपचार घेणाऱ्या 408 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यानिमित्त शुक्रवारी (दि. 24 जुलै) कोरोनामुक्त झालेल्या 16 रुग्णांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र देऊन डिस्चार्ज देण्यात आला.
कृष्णा रुग्णालयातून 408 रुग्ण झाले कोरोनामुक्त
सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा रुग्णालयातून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या चारशे पार गेली आहे. शुक्रवारी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
कृष्णा रुग्णालयातून आतापर्यंत 408 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये तळबीड येथील 7, सैदापूर येथील 1, शेंडेवाडी 1, तळमावले-पाटण 4, उफाळे-मायणी येथील 1, विंग येथील 1 आणि बंगळुरू येथील एका युवकाचा समावेश आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले, विधान परिषदेचे माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कृष्णा रुग्णालायत आतापर्यंत 564 पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले असून त्यापैकी 408 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 141 रुग्ण उपचार घेत आहेत.