सातारा- महावितरण कंपनीने १ एप्रिलपासून सर्व औद्योगिक कंपन्यांवर केव्हीएएच आधारे बिलींग आकारणी सुरू केली आहे. सर्वाधिक ४३% महसूल नियमितपणे देणारे हे ग्राहक आहेत. ही सर्व वस्तुस्थिती ध्यानी घेवून महावितरणने एप्रिल ते सप्टेंबर २०२० या ६ महिन्याच्या कालावधीसाठी केव्हीएएच आकारणी रद्द करावी. पूर्वीप्रमाणे केडब्ल्यूनुसार आकारणी करावी तसेच औद्योगिक ग्राहकांचे स्थिर आकार रद्द करून उद्योजकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
यासंदर्भात सातारा एमआयडीसीतील 'मास' या संस्थेने आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना पत्र देऊन यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली होती. उद्योजकांची समस्या सोडवण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले असून राज्यातील सर्व उद्योजकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.