सातारा : सरकार आणि प्रशासनाच्या एकतर्फी कार्यपद्धती विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध लाठी मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी रूजेश जयवंशी हे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागत असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला. भविष्यात प्रशासनाच्या कार्यपध्दतीत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
मोर्चात घोषणाबाजी : सातार्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून निषेध लाठी मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चात जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पायी चालत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. मोर्चात सरकार आणि प्रशासनाच्या कार्यपध्दतीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. त्यांनी सरकार आणि प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर सडकून टीका करत प्रशासनाला इशारा दिला.
सत्ताधाऱ्यांचा दबाव : साताऱ्यात निधी वाटपात पक्षपातीपणा केला जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरुन खोट्या कारवाया केल्या जात आहेत. जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर मोठा दबाव आहे. या दबावामुळेच जिल्हाधिकारी आणि सीईओंच्या कामकाजात अनियमीतता दिसत आहे. इतर पक्षातील कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात यावेत, यासाठी अधिकाऱ्यांच्या मार्फत दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप देखील आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.