सातारा -काय झाडी..काय डोंगार..काय हाटील..या डॉयलॉगमुळे देशभर चर्चेत आलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील एका कार्यक्रमासाठी कराडला आले असताना मित्रांसमवेत ते महाविद्यालयीन आठवणींमध्ये रमले. वर्गमित्र जयंत पालकर तसेच कृष्णाबाई ट्रस्टचे अध्यक्ष आनंद पालकर यांच्या निवासस्थानी बराच वेळ मित्रांच्या गप्पांचा फड रंगला होता.
शहाजीबापू आहेत वाय. सी. कॉलेजचे माजी विद्यार्थी -आमदार शहाजीबापू पाटील यांनी १९७६ ते ७८ या दरम्यान कराडच्या यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात बीएससीच्या दोन वर्षांचे शिक्षण घेतले होते. शेवटच्या वर्षाला ते विटा येथील कॉलेजला गेले. कराडमध्ये शिकत असताना ते शिवाजी हौसिंग सोसायटीतील एका बंगल्यात राहत होते. शेजारीच वर्गमित्र जयंत पालकर आणि कृष्णाबाई ट्रस्टचे अध्यक्ष आनंद पालकर यांचा बंगला होता. त्यामुळे शहाजीबापू आणि पालकर कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.