सातारा -अतिवृष्टी, भूस्खलन, ढगफुटीमुळे वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील देवरुखवाडी, जांभळी येथील दरडी कोसळून मोठ्याप्रमाणात घरांचे नुकसान झाले. देवरुखवाडी येथील सात घरे जमीनदोस्त झाली तर जांभळी पूल येथील घरांवर दरड कोसळून पूर्ण घरात माती, मलब्याचा ढीग साधारण तीन फूट साचला होता. अनेकांना आता पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. या ग्रामस्थांच्या खांद्यांला खांदा लावून सामाजिक कार्यकर्त्यांनी मलबा हटवून घरे स्वच्छ करून दिली.
देवरुखवाडी (ता. वाई) येथील दृश्य पश्चिम वाईत अधिक नुकसान
साताऱ्याच्या वाई, पाटण, महाबळेश्वर, जावळी तालुक्यात 22 जुलैच्या रात्री अतिवृष्टी, भुस्खलनाने मोठे नुकसान झाले. वाई तालुक्यातील देवरुखवाडी, जांभळी येथे दरडी कोसळून मोठ्याप्रमाणात घरांचे नुकसान झाले. देवरुखवाडी येथील सात घरे जमीनदोस्त झाली तर जांभळी पूल येथील घरांवर दरड कोसळून पूर्ण घरात माती, मलब्याचा ढीग साधारण तीन फूट साचला होता. रात्री दरड कोसळून परिसरातील घरात घुसली. त्यावेळी घराची मागील भिंत कोसळून मोठ्या प्रमाणात पाणी घरात शिरले. सर्व खोल्यात पाणी, माती भरले गेले. लाईट नसल्याने रात्रभर ते कुटुंब त्याही परिस्थितीत उजाडेपर्यंत मातीच्या ढिगात उभे होते. सकाळी पहातात तो सर्व होत्याचे नव्हते झाले होते. घरातील सर्व साहित्य वाहून गेले होते.
चिखल, दलदल अन् राडारोडा
सर्व खोल्यांमध्ये चिखलाचे साम्राज्य होते. अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पाणी ओसरल्यानंतर सर्वजण स्वच्छतेच्या कामात गुंतले आहेत. वाईतील कृष्णा नदी सेवाकार्य फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जीवनावश्यक साहित्य, शंभर लोकांसाठी तयार जेवणाचे डबे, कपडे, पाण्याचे बॉक्स घेऊन बाधित कुटुंबांपर्यंत पोहोचले. बाधित कुटुंबांना थोडा धीर देण्याचा प्रयत्न केला. तुमच्या घरातील चिखल थोडा सुकूद्या आम्हीं परत येऊन तुमचे सर्व घर साफ करून देतो असे सांगून परतले. या संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितिन कदम, सदस्य नगरसेवक भारत खामकर, चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, काशिनाथ शेलार, नरेश सुरसे, अमर आमले, कुमार पवार, गणेश खामकर, तुषार घाडगे, काका डाळवाले, सुर्वे, सचिन गायकवाड, देवानंद शेलार, सचिन गांधी आदी कार्यकर्ते, मानवता फउंडेशनचे स्वप्नील मांडरे, सचिन मानकुमरे व स्वयंसेवक, गंगापुरी येथील मॉर्निंग ग्रुपचे सदस्य, विजय ढेकाणे यांचे काही सहकारी व खावली गावचे माजी सरपंच गेनूबा चौधरी, असे सुमारे 50 जण सकाळी साडेआठ वाजता आवश्यक सर्व साहित्य घेऊन जांभळी पूल येथे पोहोचले.
गाणी म्हणत, घोषणा देत, पावसात भिजत दुपारी चारपर्यंत सर्व खोल्यातील चिखल माती काढून पूर्ण घराची साफसफाई करण्यात आली. अस्मानी संकटात सापडलेल्या कुटुंबास अल्पशी मदत केल्याचे समाधान केल्याचे भाव सर्वांचे चेहऱ्यावर दिसत होते.
हेही वाचा -साताऱ्यातील पाच टोळ्यांतील 15 गुंड तडीपार; पोलीस प्रशासनाचा दणका