सातारा- माणदेशी फाऊंडेशनच्यावतीने सातारा येथे माणदेशी महोत्सव २०१९ चे आयोजन केले आहे. माणदेशी पदार्थांसह वस्तू आणि संस्कृतीची ओळख जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला व्हावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. यात जवळपास २४० विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून हा महोत्सव सातारकरांसाठी एक पर्वणी ठरत आहे.
बाळगोपाळांसह मोठ्या प्रमाणावर महिलावर्ग याठिकाणी येत आहे. हे सर्वच खरेदीचा आनंद लुटत असल्याचे मत माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा रेखा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. हा महोत्सव २१ नोव्हेंबरपासून सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर सुरू आहे. यात बचत गटाच्या महिला सदस्या तसेच अंगणवाडी सेविका, सीआरपी सदस्या यासर्वांसाठी फाऊंडेशन आणि जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने २७० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. या सर्व महिलांचे ऑन्को लाईफ सेंटरच्यावतीने महिलांच्या आरोग्य विषयी शिबीर घेण्यात आले.
माणदेशी महोत्सवात माणदेशी संस्कृतीची ओळख महिलांना स्वावलंबी बनवणे व त्यांचा अर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी गत ४ वर्षांपासून माणदेशी फाऊंडेशनच्यावतीने अशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सातारा आणि मुंबई येथे या महोत्सवाचे आयोजन केले जाते. दरम्यान सातारा येथे भरवण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सातपुते व माणदेशीच्या कुटुंबप्रमुख चेतना सिन्हा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यंदाच्या माणदेशी महोत्सवाचे खास आकर्षण आहे, लघू उद्योजकांना लागणा-या मशीनरींचे प्रदर्शन आणि विक्री. या मशिनरींच्या प्रदर्शनामध्ये सेल्को सोलर लाईट प्रा.लि. म्हसवड ट्रेंडिग कंपनी, लाईफ इनक्युबिटर हॉचिंग, इनव्हो ग्रीन एल एल व्ही, सी एस सी, विज्ञान आश्रम, ड्रिम इंडिया कॉर्पोरेशन, जी केम आटा चक्की, ब्लू स्टार ऑटोमोबाईल आदी लघू उद्योग क्षेत्रात लागणा-या मशीनरींचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे स्टॉल आहेत.