सातारा - महाराष्ट्र केसरी ( Maharashtra Kesari ) कुस्ती स्पर्धा संयोजकांनी बक्षिसाची रक्कम दिली नसल्याची खंत पृथ्वीराज पाटील याने व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद उभा राहिला आहे. त्यावर आता सातारा तालीम संघाचे समन्वयक सुधीर पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पृथ्वीराज पाटील याला दोन लाखांचा धनादेश पाठवला आहे. इर्षेपोटी पैलवानांना चार पैसे जास्त मिळणार असतील तर चांगलचं आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.
64 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्याच्या छत्रपती शाहू क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरचा 5-4 या फरकाने पराभव ( Maharashtra Kesari Win Prithviraj Patil ) केला. ही स्पर्धा झाल्यानंतर आता पृथ्वीराज पाटीलने एक खंत व्यक्त केली आहे. "यापूर्वी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी संयोजकांकडून त्यांच्यापरीने रोख स्वरुपात बक्षिसाची रक्कम देण्याची परंपरा आहे. तथापि साताऱ्यातील संयोजकांनी ही परंपरा पाळली नाही," असे पृथ्वीराज म्हणाला.
सुधीर पवार प्रतिक्रिया देताना यजमानांना बक्षीस ऐच्छिक - त्याबाबत सातारा जिल्हा तालीम संघाचे समन्वयक सुधीर पवार यांच्याशी 'ई टीव्ही भारत'ने संपर्क साधला. पवार यांनी सांगितले की, "महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यजमान संस्थेने दिलेली बक्षिसाची रक्कम ही ऐच्छीक असते. महाराष्ट्र केसरींना राज्यशासन ६० हजार रुपये देते. दरमहा ६ हजार रुपये पेन्शन देते. पदक विजेत्यास जे द्यावे लागते त्या गोष्टी ऐच्छिक होत्या. तरीसुद्धा आमच्या संस्थेचे विश्वस्त व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या बातमीनंतर जिल्हा तालिम संघातर्फे तात्काळ २ लाख रुपयांचा धनादेश पाठवला आहे."
बदनामीने पैलवान श्रीमंत होणार का? -"झालेला प्रकार गैरसमजातून आहे. कोट्यावधी रुपये आम्हीं पैलवानांसाठीच खर्च केले आहेत. त्यामाध्यामातून चुकीचा मेसेज जाता कामा नये. पैलवान पृथ्वीराज पाटील यांच्या वक्तव्यामागे राजकारण नाही. उलट त्यांना वक्तव्य करण्यासाठी कोणी उचकवले असेल तर चांगले आहे. त्यामुळे पैलवानांना इर्षेपोटी पैसे मिळून जातील. कोणी दोन लाख, कोणी पाच लाख करेल. या बातमीची पब्लिसिटी होऊ द्या आणि पृथ्वीराज पाटील यांना जास्त पैसे मिळू देत. आमची बदनामी करून त्यांना पैसे मिळणार असतील तर सर्वांनी पैसे द्यावेत. पैलवान त्यातून श्रीमंत होईल, असा टोलाही पवार यांनी शेवटी लगावला आहे.
हेही वाचा -Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीवर 'पृथ्वी'राज; 22 वर्षांनंतर कोल्हापूरला मान