सातारा- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रा राज्यभर सुरु आहे. या यात्रेचे आज दुपारी सातारा जिल्ह्यात आगमन झाले असून जिल्ह्याच्यावतीने खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील पावणेपाच वर्षात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. या यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात महाजनादेश यात्रेचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील हजारो भाजप पदाधिकारी उपस्थित होते. शिरवळ येथे पुणे-बंगळुरू महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ही महाजनादेश यात्रा शिरवळ-सुरुरमार्गे वाई येथे आली आहे. तेथून सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर सायंकाळी या महाजनादेश यात्रेचे आगमन होणार आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून नुकतेच भाजपात दाखल झालेल्या माजी खासदार उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केलेली आहे. संध्याकाळी सातार्यातील कार्यक्रम संपल्यानंतर ही जनादेश यात्रा कराडकडे रवाना होणार आहे.
कराडमध्ये सातारा जिल्ह्यातील या यात्रेची सांगता होणार आहे. माजी खासदार उदयनराजे यांच्या भाजपप्रवेशामुळे सातारा शहरात भाजपल अच्छे दिन आल्यामुळे सातार्यात बॅनरबाजीसह भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे.