कराड (सातारा)- कमी दरात सोने विकण्याच्या बहाण्याने लूटमार करणारी मध्य प्रदेशातील कटणी येथील आठ जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात सातारा जिल्हा पोलिसांना यश आले आहे. कराड तालुक्यातील पेर्ले गावच्या हद्दीत सोन्याचा सौदा करण्याकरिता ही टोळी आली होती. या टोळीतील संशयीतांना हटकणार्या पाटण पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यावर टोळीतील सदस्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात ते गंभीररित्या जखमी झाले आहे. त्यानंतर अवघ्या १२ तासात पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या.
राजा रेणू आदीवासी (वय २४), अंजरगजातलाल आदिवासी (वय २३ ), आसतसोनी आदिवासी, मुबारक बंदिलाल राजपुत (वय २० ), दद्दा रेणू आदिवासी(वय २० ), करोसण बंदिलाल आदिवासी राजपूत (वय २६), बंदीलाल भदोसलालआदिवासी (वय ४०), खलिस्ते भुरा आदिवासी (वय ४०, सर्व रा. कटणी (मध्य प्रदेश), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
एक पोलीस अधिकारी जखमी
मध्य प्रदेश राज्यातील कटणी येथील आठ जणांची टोळी बनावट सोने विकण्याच्या बहाण्याने फसवणूक आणि लूटमार करत होती. शुक्रवारी पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर पेर्ले (ता. कराड) गावच्या हद्दीत सोने विक्रीचा सौदा होणार होता. त्या दरम्यान, पाटण पोलीस स्टेशनचे कर्मचारी मुकेश संभाजी मोरे हे शासकीय कामानिमीत्त सातार्याकडे निघाले होते. त्यांना खबर्यामार्फत पेर्ले गावच्या हद्दीत सोन्याचा सौदा होणार असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या अनुषंगाने मोरे यांनी पाळत ठेवली असता शिरगावकडे जाणार्या रस्त्याच्याकडेला चौघेजण त्यांना संशयास्पदरित्या उभे असल्याचे दिसले. मोरे यांनी त्यांना हटकले असता संशयितांनी लाकडी दांडकी, गजाने त्यांच्यावर हल्ला केला. तसेच एकाने त्यांच्या उजव्या हाताच्या दंडाला चावा घेतला.
१२ तास कोम्बिंग ऑपरेशन
त्याचवेळी उसात लपून बसलेले संशयीतांचे साथीदारही बाहेर आले. मोरे यांनी तातडीने वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. त्यामुळे सातारा स्थानिक गुन्हे शाखेसह कराड शहर, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेसह उंब्रज पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संशयितांनी पोबारा केला होता. जखमी झालेल्या पो. कॉ. मुकेश संभाजी मोरे यांच्यावर उंब्रज येथील शारदा क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. संशयितांना पकडण्यासाठी १२ तास कोम्बिंग ऑपरेशन राबवत संयुक्त पथकाने या टोळीचा छडा लावला. ही टोळी मध्य प्रदेशातील असल्याचे तापासात उघड झाले.