महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाटणमध्ये सरपंचाच्या घरात बिबट्याचा ९ तास थरार; बेशुद्धीचे प्रयत्न फसले - Patan satara

मारूल हवेली (ता. पाटण) या गावात सोमवारी रात्री सरपंचाच्या घरातील पोटमाळ्यावर जाऊन बसलेल्या बिबट्याचा ९ तास थरार पहायला मिळाला. बेशुध्द करण्याचे आणि पिंजरा, वाघरीत पकडण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर पहाटे बिबट्या धूम ठोकून रानात पसार झाला.

सातारा
सातारा

By

Published : Mar 31, 2020, 5:45 PM IST

कराड (सातारा) - खासदार श्रीनिवास पाटील यांच्या मारूल हवेली (ता. पाटण) या गावात सोमवारी रात्री सरपंचाच्या घरातील पोटमाळ्यावर जाऊन बसलेल्या बिबट्याचा ९ तास थरार पाहायला मिळाला. त्याला बेशुद्ध करण्याचे आणि पिंजरा, वाघरीत पकडण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर पहाटे बिबट्या धूम ठोकून रानात पसार झाला.

खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांनी सोमवारी (दि. ३०) रात्री साडेनऊ वाजता वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्याशी संपर्क साधला. मारूल हवेलीचे सरपंच नितीन शिंदे यांच्या रानातील घरात बिबट्या शिरला आहे. तत्काळ येऊन बिबट्यास 'रेस्क्यू' करण्यास सांगितले.

रोहन भाटे यांनी परिक्षेत्र वनाधिकारी विलास काळे व सातारा जिल्हा उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर भाटे आणि परिक्षेत्र वनाधिकारी विलास काळे, वनरक्षक रमेश जाधवर, सौरभ लाड हे पिंजरा, वाघर, टॉर्चसह 'रेस्क्यू' साहित्य घेऊन रात्री साडेदहा वाजता घटनास्थळी पोहचले.

सरपंच नितीन शिंदे यांच्या रानातील घरामध्ये सायंकाळी 7.30 च्या सुमारास बिबट्या शिरला होता. त्यांच्या मुलीने बिबट्या घरात जाताना पहिले. तिने घरातील लोकांना सावध करून घराची दारे बंद केली. बिबट्या घरातील पोटमाळ्यावर होता. बिबट्याला पकडण्यासाठी एका दरवाजाबाहेर पिंजरा लावण्यात आला. बिबट्याला हुसकावूनही तो पिंजऱ्यात येत नव्हता. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक महादेव मोहिते यांना संपर्क करून बेशुद्ध करण्याची बंदूक मागवून घेण्यात आली.

कोल्हापूरहून वनविभागाचे व्हेटनरी डॉ. वाळवेकर आणि बचाव पथकालाही पाचारण करण्यात आले. सर्वजण आल्यानंतर रात्री 2 वाजता डॉ. वाळवेकर यांनी औषधाचा डोस भरून 'डार्ट' तयार केले. पाहिले डार्ट फायर झाले. पण ते बिबट्यास लागले नाही. पुन्हा दुसरे जवळहून मारण्यात आले. ते अचूकपणे बिबट्याच्या उजव्या मांडीत घुसले. पण बिबट्या बेशुद्धावस्थेत जात नव्हता. जवळपास दीड तास वाट पाहून पुन्हा डार्ट मारण्यात आला. ते अचूकपणे उजव्या मांडीत घुसले. दीड तास वाट पाहिली तरी बिबट्या बेशुद्ध झाला नाही.

डॉ. वाळवेकर यांनी पुन्हा 'ब्लॉ पाईप'ने दोन वेळा डार्ट मारण्याचा प्रयत्न केला. पण बिबट्याने ते चुकविले. एक वेळा 'स्टीक'ने डार्ट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, बिबट्याने तोंडात धरून इंजेक्शन तोडले. त्यावेळी पहाटेचे साडेपाच वाजले होते.

अखेर बिबट्यास वाघरीमध्ये पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचवेळी बिबट्याने दुसऱ्या एका कौलातून बाहेर डोकावत पत्र्यावर उडी मारून धूम ठोकली आणि रानात पसार झाला. त्यामुळे मंगळवारी सकाळी मारुल हवेली भागात पिंजरे लावण्यात आले आहेत.

सोमवारी रात्री १० वाजल्यापासून मंगळवारी पहाटे साडेपाचपर्यंत 9 तास वनपरीक्षेत्र अधिकारी विलास काळे, वन्यजीव रक्षक रोहन भाटे, डॉ. वाळवेकर, वनविभागाचे कर्मचारी, सरपंच नितीन शिंदे यांनी बिबट्यास पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, बिबट्याने सर्वांना चकवा देऊन धूम ठोकली.

ABOUT THE AUTHOR

...view details