गेल्या 2 दिवसात खटाव तालुक्यात तब्बल 25 कोरोनाबाधितांची नोंद - satara corona news
खटाव तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या वडूजमध्ये एकाच दिवसात १३ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे शहरातील बाधितांची एकूण संख्या ३२ झाल्याने वडूजकर चांगलेच धास्तावले आहेत.
खटाव (सातारा) - खटाव तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या वडूजमध्ये एकाच दिवसात १३ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे शहरातील बाधितांची एकूण संख्या ३२ झाल्याने वडूजकर चांगलेच धास्तावले आहेत. तालुक्यातील विसापूर येथे ७, बनपुरी, पाचवड, उंबर्डे आणि खटाव येथे प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून वडूजमधील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. एकाच गल्लीत कोरोनाची साखळी वाढत आहे. शुक्रवारी शहरात चार रुग्ण वाढले होते. त्याच वेळी बाधितांच्या निकट सहवासातील १२३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. आज सकाळी त्यातील ९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सायंकाळी आणखी चार जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वडूजकर चांगलेच धास्तावले आहेत. शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३२ झाल्याने प्रशासनाच्याही चिंतेत भर पडली आहे.
तालुक्यातील विसापूर येथील बाधितांच्या संपर्कातील ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बनपुरी येथील ५१ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. पाचवड येथील कोरोनाबाधिताच्या निकट सहवासातील ४० वर्षीय पुरुषालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. खटाव गावातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संजीवनी हॉस्पिटल येथे उपचार घेत असणाऱ्या एका महिलेचा खासगी तपासणीत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधित महिलेच्या कुटुंबातील सहा निकट सहवासितांना पुसेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरणात दाखल करण्यात आले आहे. तहसिलदार डॉ. अर्चना पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनुस शेख, स.पो.नि. विश्वजीत घोडके यांनी खटावमध्ये भेट देवून बाधितांच्या घराभोवती मायक्रो कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे.