कराड (सातारा) : कोल्हापूरला निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्टेशनवर रोखण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी मनी लॉन्ड्रिंगचे आरोप केले होते. त्यानंतर ते मुश्रीफ यांचा गृहजिल्हा कोल्हापूरला जाऊन पत्रकार परिषद घेणार होते. मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी सोमय्यांना विरोध करायचे ठरविले असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पोलिसांनी सोमय्या यांना कराडमध्येच थांबवले आणि तिथून त्यांना मुंबईला परत पाठवले जाणार आहे.
ठाकरे सरकारवर आरोप
सोमय्या यांना कराड येथे रोखण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरे सरकारच्या पोलिसांनी मला घरात स्थानबद्ध करुन ठेवल्याचा आरोप सोमय्यांनी केला.
ठाकरे सरकारला सोमय्यांचा इशारा
'मला सहा तास घरात कोंडून ठेवण्यात आले. गणेश विसर्जनासाठीही घराबाहेर जाऊ दिले नाही. पोलिसांनी बनावट आदेश मला दाखवले आणि कोल्हापूरला जाता येणार नाही असे सांगण्यात आले. या सर्व प्रकाराविरोधात कोर्टात जाणार आहे', असा इशार सोमय्या यांनी दिला.
अजित पवारांच्या अडचणी वाढणार?
'ठाकरे सरकार मला कुठे आणि किती अडवणार? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे. 'पुढच्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यानावे कोर्लई येथे खरेदी करण्यात आलेल्या जमीनीची पाहाणी करणार आहे. पुढच्या सोमवारी ही पाहाणी करणार आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरेदी केलेल्या कारखान्यालाही भेट देणार आहे. पारनेर येथील साखर कारखान्याचीही पाहाणी करणार आहे. ठाकरे सरकार मला कुठे आणि किती रोखणार आहे?', असा सवाल सोमय्या यांनी केला. तसेच, ठाकरे सरकारला मी घाबरत नसल्याचेही सोमय्या म्हणाले. दरम्यान, सोमय्यांनी मुश्रीफांनंतर आता अजित पवारांना घेरायला सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढणार का? याकडे लक्ष लागले आहे.
हसन मुश्रीफांचा तिसरा घोटाळा समोर येणार
हसन मुश्रीफ यांनी १२७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे. मुश्रीफांनी हे आरोप याआधीच फेटाळले आहेत. मात्र सोमय्या हे त्यांच्या वक्तव्यावर आजही ठाम आहेत. गडहिंग्लज साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया ही बोगस आहे. २०२० मध्ये ब्रिक्स इंडिया कंपनीला हा कारखाना देण्यात आला. मात्र ब्रिक्स इंडिया ही बेनामी कंपनी आहे. या कंपनीत ९८ टक्के शेअर कॅपिटल हे कोलकात्यातून आले आहेत. फक्त दोन टक्के शेअर हे मुश्रीफांच्या जावयाचे आहेत. याशिवाय लवकरच मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्याशी संबंधीत कागदपत्र आयकर विभाग आणि ईडीकडे सुपूर्द केली जाणार', असे सोमय्या म्हणाले.
मुश्रीफ यांनी आरोप फेटाळले
माझ्या आजाराबद्दल मला विचारल्याबद्दल मी भाजप नेते किरीट सोमैया यांचा आभारी आहे, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे भाजपच्या मोठ्या षडयंत्राचा भाग आहेत, असे मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे या प्रकरणाचे सूत्रधार आहेत. मी सतत केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या गैरवापराबद्दल बोलत होतो. म्हणून ते माझ्या मागे आहेत. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरात भाजपला सपाट करण्यासाठी मला लक्ष्य केले जात आहे. पाटील यांनी त्यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचा दावाही त्यांनी केला.
संजय राऊत यांची टीका
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमैयांशी संबंधित नाटक हे मराठी रंगभूमीचा अपमान असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या पाठिंब्याने महाविकास आघाडी सरकारला कमजोर करण्याचा हा प्रयत्न आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्र्यांनी केलेली कारवाई मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशी सुसंगत होती असे म्हणणे चुकीचे असल्याचे राऊत म्हणाले.
किरीट सोमैयांना अटक नाही - नाना पटोले
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया कोल्हापूरला गेले असते. त्यामुळे त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. म्हणूनच कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमैया यांना नोटीस पाठवली होती. त्यामुळेच किरीट सोमैया यांना कराडमध्ये थांबवण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकारने त्यानुसार आपले काम केले. या प्रकरणात किरीट सोमैया यांना अटक झाली नाही. किरीट सोमैया यांना अटक करण्यात आल्याचे विधान खोटे असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -कंगना आज कोर्टात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता