कोविडमुळे सलग दुसऱ्या वर्षी कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रम रद्द - karad latest news
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
सातारा -रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षी ९ मे रोजी विविध उपक्रमांनी होतो. मात्र कोविडच्या भयावह परिस्थितीमुळे सलग दुस-यावर्षी तो साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी दिली. त्यांनी सांगितले, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी 9 मे रोजी विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची यावेळी विशेष उपस्थिती असते. कोविड-१९मुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता रविवार, 9 मे रोजी होणारा कर्मवीर पुण्यतिथीचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
व्याख्यानसत्रे नाही होणार
कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने ७ व ८ मे राेजी संस्थेच्या वतीने यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (वायसी काॅलेज) येथे माध्यमिक विभागाकडील शाखाप्रमुख व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाकडील प्राचार्यांसाठी शैक्षणिक व्याख्यान सत्रांचे आयोजन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत, असेही डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी सांगितले.
६१ वर्षांत दुसऱ्यांदा वेळ
दरवर्षी ९ मे हा कर्मवीरांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. कर्मवीरांच्या समाधीपुढे नतमस्तक होऊन आण्णांप्रती कृत्यज्ञता व्यक्त करण्यासाठी शेकडो रयतसेवक, पदाधिकारी, विद्यार्थी साताऱ्यात कर्मवीर समाधी परिसरात येतात. यानिमित्ताने संस्थेमार्फत नव्या योजना, नवे उपक्रम जाहीर केले जातात. संस्थेच्या कार्यकारीणीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतले जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यावर्षी सलग दुसऱ्यांदा संस्थेने सर्व कार्यक्रम, समारंभ रद्द केले आहेत.
रयतचा विस्तार
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांकडून प्रेरणा घेऊन कर्मवीर आण्णांनी लोकांच्या सहकार्याने काले (ता. कराड) येथे ता. ४ ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, वसतीगृहे असा रयतच्या वटवृक्षाचा शाखा विस्तार महाराष्ट्रभर केला. आज संस्थेच्या ७३९ शाखा, १६ हजार कर्मचारी आणि तब्बल साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी 'रयत'च्या वटवृक्षाखाली शिक्षण घेत आहेत. या कर्मयोग्याचे पुण्यातील ससून रुग्णालयात ता.९ मे १९५९ रोजी हृदयविकाराने निधन झाले.