सातारा- कराडचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यावर नगरसेवक आणि आरोग्य कर्मचार्यांनी स्वच्छता अभियान राबवून ४ ट्रॉली कचरा गोळा केला. याद्वारे नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या तयारीचा शुभारंभ केला. तसेच, कराडचे बसस्थानकही चकाचक केले. या उपक्रमात नगराध्यक्षासह नगरसेवक, मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि सुमारे २०० कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी होते.
कोल्हापूर नाका हा कराडचे प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा आहे. त्यामुळे, गांधी जयंतीचे औचित्य साधत गांधी पुतळ्यास अभिवादन करून कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या तयारीचा शुभारंभ केला. गांधी पुतळा परिसरासह आशियाई महामार्गाच्या उड्डाणपुलाखालील ४ ट्रॉली कचरा काढण्यात आला. नगरपालिकेतील आरोग्य विभाग, कर विभाग, ड्रेनेज विभाग, पाणीपुरवठा विभागासह लायब्ररी विभागातील कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.