आरोपीला झालेल्या फाशीच्या शिक्षेवर सरकारी वकिलाची प्रतिक्रिया सातारा : संतोष चंद्रू थोरात (वय 41, रा. रूवले, ता. पाटण) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सरकारी पक्षाचे वकील राजेंद्र सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद आणि ढेबेवाडी पोलिसांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने हा निकाल दिला. कराड न्यायालयाच्या इतिहासात फाशी होण्याची ही पहिलीच घटना आहे.
निर्जनस्थळी नेऊन अत्याचार आणि हत्या :आरोपी संतोष थोरात याने दि. 29 डिसेंबर 2021 रोजी गावातीलच अल्पवयीन मुलीला तिच्या मैत्रिणीसह शेतात नेले होते. शेतातून परत आल्यावर त्या दोन्ही मुली आरोपीच्या घराबाहेर खेळत होत्या. काही वेळानंतर पीडित मुलीची मैत्रिण घरी निघून गेली. पीडित चिमुरडी एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत रूवले गावातील निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला. त्यानंतर गळा दाबून तिचा निर्घृणपणे खून केला होता.
मृतदेह दरीत फेकला :आरोपीने चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह दरीत फेकून दिला. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर शोधाशोध सुरू झालाीआणि मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. ढेबेवाडी पोलिसांनी पोक्सो आणि खुनाच्या गुन्ह्याखाली आरोपीला अटक केली होती. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
पुरावे, जबाब आणि युक्तिवाद ठरला महत्त्वाचा :या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. राजेंद्र शहा यांनी 33 साक्षीदार तपासले. त्यातील शेवटच्यावेळी (लास्ट सीन विटनेस) मुलीला पाहणार्या साक्षीदारांसह मुलीचा मृतदेह आरोपीने काढून दिला, त्यावेळच्या शोध पंचनाम्यातील साक्षीदाराचा जबाब महत्त्वपूर्ण ठरला. आरोपीच्या अंगावर पीडित मुलीचे केस सापडले होते. तसेच डीएनए अहवाल देखील पुरावा म्हणून न्यायालयात महत्त्वाचा ठरल्याची माहिती सरकारी वकील अॅड. शहा यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांनंतर फाशीची शिक्षा ठोठावली गेली आहे. पोक्सो सारख्या खटल्यात फाशीची शिक्षा झाल्याने बाल लैंगिक अत्याचार कायदा आणि न्यायालयावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. - अॅड. राजेंद्र शहा, सरकारी वकील