महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसामुळे कास पठारावरील फुलांच्या हंगामाची 'अवकाळी' सांगता - kaas plateau

जागतिक निसर्गवारसा स्थळाचा दर्जा मिळालेले कास पठार दरवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात रानफुलांनी बहरते. साधारण 50 दिवस कास पठारावर फुलांचा मौसम चालतो. मात्र परतीच्या मान्सूनने यंदाचा हंगाम आवरता घेतला आहे.

kaas pathar tourism
पावसामुळे कास पठारावरील फुलांच्या हंगामाची 'अवकाळी' सांगता

By

Published : Oct 17, 2020, 2:33 PM IST

सातारा - नुकत्याच झालेल्या पावसाने कासच्या फुलांवर आणि पर्यटकांच्या उत्साहावर पाणी फिरवले. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने कासच्या रानफुलांचा बहर वेळेआधीच संपला.

जागतिक निसर्गवारसा स्थळाचा दर्जा मिळालेले कास पठार दरवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात रानफुलांनी बहरते. साधारण 50 दिवस कास पठारावर फुलांचा मौसम चालतो. युनेस्कोने जागतिक निसर्ग वारसास्थळाचा दर्जा पठाराला दिल्याने केवळ राज्यातील नव्हे तर, देशासह जगभरातील पर्यटकांचे पाय कास पठाराकडे वळतात.

पावसामुळे कास पठारावरील फुलांच्या हंगामाची 'अवकाळी' सांगता
गडद निळ्या रंगाची आणि त्यावर पांढरे ठिपके असलेली सीतेची आसवं, पिवळ्या रंगाची व त्यावर दोन लाल ठिपके असलेली स्मितीया (कावळा), पांढरी गेंद व गुलाबी तेरडा अशा विविध रंगांच्या फुलांनी या वर्षी पठारावर हजेरी लावली होती. गुलाबी रंगाच्या तेरड्याच्या फुलांनी जणू पठारावर गालिचा अंथरल्याचे चित्र होते. पठारावरील बहुतांश रानफुलांचे आयुष्यमान 10 ते 15 दिवसांचे असल्याने पठार वरच्यावर रंग बदलत असते.

मुसळधार पावसाने पठारावर चिखल

यावर्षी फुलांचा रंगोत्सव लवकर संपला. या पठाराची देखभाल करण्याचे काम स्थानिक लोकांच्या सहभागाने तयार केलेली कास कार्यकारी समिती करते. गेल्या आठवड्यात दोन दिवस पठार आणि जवळच्या परिसरात पाऊस झाला. या पावसाने तेरड्याच्या फुलांना फटका बसला. त्यानंतर देखील चार दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र चिखल झाला असून फुलांना बहर आटोपता घ्यावा लागला, असे या समितीचे अध्यक्ष बजरंग कदम यांनी सांगितले.

परतीच्या मान्सूनने यंदाचा हंगाम आवरता घेतला आहे.
पर्यटकांचीही नाराजी

सध्या पठारावर फक्त पिवळ्या रंगाची मिकी माऊसची फुलं कमी प्रमाणात पहायला मिळतात. त्याचबरोबर कुमोदिनी फुलं काही प्रमाणात आहेत. गेल्या चार दिवसांत येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. कोविडमुळे यंदा कासचे पर्यटन प्रशासनाने खुले केले नव्हते. जे काही तुरळक स्थानिक पर्यटक शनिवार-रविवार कासला जात होते. तेही हंगाम लवकर संपल्याने यायचे थांबले आहेत. त्यामुळे येथील पर्यटनावर अवलंबून व्यावसायिकांना देखील फटका बसला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details