सातारा -घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा बेकायदेशीर साठा केलेल्या कराडमधील वराडे गावातील एका गोदामावर पोलीस आणि पुरवठा विभागाने शुक्रवारी छापा टाकला. याप्रकरणी पाटण पंचायत समितीच्या माजी सभापतींचे पती नारायण जगन्नाथ कारंडे (रा. ढेबेवाडी, ता. पाटण) आणि अंकुश रामचंद्र हजारे (रा. वराडे, ता. कराड) यांच्यावर जीवनावश्यक वस्तु अधिनियमान्वये तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गोदामात 162 बेकायदेशीर सिलिंडर आढळले आहेत.
सिलिंडरचा बेकायदेशीर साठा, माजी सभापतींच्या पतीसह दोघांवर गुन्हा दाखल - साताऱ्यात माजी सभापतींच्या पतीवर गुन्हा न्यूज
वराडे गावातील एका लोकवस्तीमध्ये भारत गॅस एजन्सीच्या सिलिंडरचा बेकायदेशीर साठा करण्यात आला असल्याची माहिती कराडचे डीवायएसपी सूरज गुरव यांना मिळाली होती. गुरव यांनी त्यांचे विशेष पथक, कराड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक, तळबीड पोलीस ठाण्याचे पथक आणि पुरवठा विभागाच्या अधिकार्यांचे संयुक्त पथक तयार करून छापा मारण्यास सांगितले.
वराडे गावातील एका लोकवस्तीमध्ये भारत गॅस एजन्सीच्या सिलिंडरचा बेकायदेशीर साठा करण्यात आला असल्याची माहिती कराडचे डीवायएसपी सूरज गुरव यांना मिळाली होती. गुरव यांनी त्यांचे विशेष पथक, कराड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक, तळबीड पोलीस ठाण्याचे पथक आणि पुरवठा विभागाच्या अधिकार्यांचे संयुक्त पथक तयार करून छापा मारण्यास सांगितले. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, तळबीडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील, डीवायएसपींचे वाचक फौजदार एस. डी. शेलार, हवालदार सतीश जाधव, सचिन साळुंखे, योगेश भोसले, कॉ. फल्ले, पुरवठा निरीक्षक विलास गभाले, उपलेखापाल नितीन गोरे यांच्या पथकाने वराडे येथे छापा मारला. त्यावेळी भारत गॅस एजन्सीची घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या 162 सिलिंडरचा साठा तेथे आढळला.
या घटनेप्रकरणी पुरवठा निरीक्षक विलास गभाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण कारंडे आणि अंकुश हजारे यांच्यावर तळबीड पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तु अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, नारायण कारंडे यांच्याकडे भारत गॅसची अधिकृत एजन्सी असून त्यांना पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागाचे कार्यक्षेत्र देण्यात आले आहे. नारायण कारंडे हे पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती वनिता कारंडे यांचे पती आहेत. त्यांच्यावर झालेल्या कारवाईची पाटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.