सातारा- कोरेगाव येथील आयसीआयसीआय बँकेचे शाखाधिकारी महेश पाटील यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांच्या बँकेतील कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी शाखाधिकारी महेश पाटील यांच्यावर पुसेगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पंकज शिवाजी गायकवाड (वय २७ रा.शिंदेवाडी, ता.खटाव)असे आत्महत्या केलेल्या बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पंकज हा वडूज येथील आयसीआयसीआयमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत होता. त्यानंतर त्यांनी बँकेची परीक्षा देऊन त्याच बँकेत रेलेशनशिप ऑफिसर म्हणून पद मिळवले होते. एक वर्ष पुणे येथील बँकेच्या शाखेत काम केल्यानंतर गेल्या दोन वर्षापासून पंकज कोरेगाव येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत काम करत होता. वडील शिवाजी गायकवाड यांनी फिर्याद दिल्यानंतर शाखाधिकारी महेश पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
वर्षभरापासून बँकेचे शाखाधिकारी महेश पाटील हे पंकजच्या मोबाईलवर सातत्याने कामावर काढून टाकेल, अशी विनाकारण धमकी देत होते. तुझे काम बरोबर नाही. तुला कामावर काढून टाकणार आहे. तु त्या लायकीचा आहेस. तुझे प्रवास भत्ता बिल मंजूर करणार नाही. काय करायचे ते कर अशी वारंवार धमकी देत होते. याबाबत पंकज यांच्या मोबाईलवर या दोघातील संभाषण रेकॉर्डिंग झालेले आहे. त्यांचे दिवसभर इतरत्र फिरून आलेली कामे संबंधित शाखाधिकारी दुसऱ्या व्यक्तीच्या नावे सातत्याने टाकत होते. तुझ्यामुळे बँकेचे परफॉर्मन्स खाली आला आहे. कामावरून तरी काढून टाकतो नाहीतर तुझी बदलीच करतो, अशी धमकी त्याच्या व्हा्ॅट्स अॅपवर त्यांच्याकडून दिली जात होती.
घराची जबाबदारी अंगावर असल्याने जर कामावरून काढून टाकले तर काय होईल. या विचाराने पंकज गेल्या चार-पाच दिवसांपासून प्रचंड दबावाखाली व मानसिक दडपणाखाली होता. या त्रासाला कंटाळून त्याने रविवारी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.