सातारा - 'राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेतून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धक तयार होत असून, राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल करण्याची संधी आहे. या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी कशाचीही तमा न बाळगता जिद्दीने खेळावे विजय तुमचाच आहे', असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आज 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी क्रीडा ध्वज फडकावून उद्घाटन केले. यावेळी सर्व खेळाडूंनी मान्यवरांना मानवंदना दिली.
हेही वाचा -मोहम्मद शमी आणि मयांक अग्रवालने गाठले कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, 'आपल्या देशातील बऱ्याच खेळाडूंनी अनेक अडचणींवर मात करुन राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल केले आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्पर्धकांनी आपली भावी वाटचाल करावी. राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल करण्याची क्षमता स्पर्धेतील सहभागी खेळाडूंमध्ये आहे. प्रयत्न करत राहा. एक दिवस यश नक्की प्राप्त होईल.'