सातारा :जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रूक गावात एका पतीने पत्नीवर चारित्र्याच्या संशयातून डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून ठार केले. ही घटना आज (मंगळवार) सकाळी 7.30 च्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा निवास उत्तम महापुरे (वय 32) याने तक्रार दिली असून आरोपी पतीविरोधात पाटण पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित आरोपी पती उत्तम सखाराम महापुरे याला तत्काळ ताब्यात घेतले असल्याची माहिती पाटणचे प्रभारी सपोनि एम. एस. भावीकट्टी यांनी दिली.
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या, पाटण तालुक्यातील घटना - husband murdered wife satara news
दिवशी बुद्रूक, ता. पाटण येथे एका पतीने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन पाटण पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पाटण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवशी बुद्रूक, ता. पाटण येथील उत्तम सखाराम महापुरे (वय 55) हा आपली पत्नी सावित्रीबाई महापुरे (वय 50) यांच्यावर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होता. यावरून दोघांच्यात अनेकवेळा वादविवाद होत होते. दरम्यान, आज सकाळी 7.30 च्या सुमारास उत्तम महापुरे याने राहत्या घरात झोपेत असलेली पत्नी सावित्रीबाईच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले. अचानक झालेल्या हल्ल्याने सर्वजण खडबडून जागे झाले. मात्र, घाव वर्मी बसल्याने सावित्रीबाई गंभीर जखमी होऊन निपचित पडली. हल्ल्याच्या घटनेनंतर झालेल्या आरडाओरड्याने शेजारचे लोक धावून आले. तरुणांनी तातडीने जखमी सावित्रीबाईला तत्काळ कराड येथे उपचारासाठी नेण्याची धावपळ केली. कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथे बेड उपलब्ध नसल्याने त्यांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच सावित्रीबाईचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, या घटनेची तक्रार मृत सावित्रीबाईचा मुलगा निवास उत्तम महापुरे याने पाटण पोलिसात दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी उत्तम महापुरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि एम. एस. भावीकट्टी करत आहेत.