सातारा -महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई झाल्यानंतर फरार झालेला किरण आबा मदने (रा. जरांबवस्ती, राजापूर, ता. खटाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन किलोमीटर पाठलाग करुन जेरबंद केले. मदनेवर शिरवळ, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून तो कुख्यात गुन्हेगार योगेश मदने याच्या टोळीचा सदस्य आहे.
मोक्कातील खटावचा फरार गुंड किरण मदने जेरबंद - marathi batmya
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई झाल्यानंतर फरार झालेला किरण आबा मदने (रा. जरांबवस्ती, राजापूर, ता. खटाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन किलोमीटर पाठलाग करुन जेरबंद केले.
विविध पोलीस ठाण्यात गुन्हे
खटाव तालुक्यातील राजापूर येथील योगेश मदने याच्यावर शिरवळ, फलटण ग्रामीण, दहिवडी पोलीस ठाण्यात दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, प्रेमी युगलांना मारहाण करून लुटमार करण्याचे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच या टोळीने लुटमारीचा प्रकार केला होता. या टोळीवरील वाढते गुन्हे लक्षात घेता टोळीप्रमुख योगेश मदने आणि त्यातील सदस्यांवर पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी मोक्का कायद्यानुसार कारवाई केली होती. मात्र, त्यांचा साथिदार किरण मदने फरार होता.
दोन किलोमीटर पाठलागाचा थरार
किरण मदने ताथवडा घाट परिसरात असल्याची माहिती 'एलसीबी'ला मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे आणि त्यांच्या टीमने ताथवडा घाटात सापळा रचला. किरण मदने ताथवडे घाटाच्या कठड्यालगत असणाऱ्या एका झाडाखाली लपून बसला होता. पोलीस त्याच्या दिशेने जात असताना तो पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. जवळपास दोन किलोमीटर पाठलाग करुन त्याला 'एलसीबी'ने ताब्यात घेतले. यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली मोहीम फत्ते
या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, हवालदार सुधीर बनकर, संतोष सपकाळ, मोहन नाचण, शरद बेबले, साबीर मुल्ला, राजकुमार ननावरे, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, गणेश कापरे, अमित सपकाळ, केतन शिंदे, प्रवीण फडतरे, रोहित निकम सहभागी झाले होते.