कराड (सातारा) - कराड तालुक्यात बिबट्यांचा वावर आणि दर्शन हे नित्याचेच बनले आहे. रविवारी (दि. 1 मे) सकाळी ओंड आणि तांबवे (ता. कराड) या गावांमध्ये चक्क रानगव्यांचे दर्शन झाले. आजुबाजूला असलेल्या डोंगरातून हे रानगवे नागरी वस्तीकडे आले. ओंड येथे एका तर तांबवे गावात सहा रानगव्यांचे दर्शन झाले. या गव्यांनी उसाच्या पिकाचे मोठे नुकसान केले आहे.
रानगव्याच्या दर्शनाने ओंडमध्ये खळबळ -उंडाळे खोर्यातील ओंड गावात पड नावाच्या शिवारात रविवारी (दि. 1 मे) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एका रानगव्याचे दर्शन शेतकर्याला झाले. शेतकर्याने या रानगव्याचा व्हिडिओ मोबाइल कॅमेर्यात कैद केले आहे. काही वेळ हा रानगवा शेतात वावरला आणि नंतर डोंगराच्या बाजूला निघून गेला. मात्र, रानगव्यांचा वावर गावानजीकच्या शिवारात दिसून आल्यामुळे शेतकर्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाली आहे. आतापर्यंत बिबट्यांची दशहत होती. आता रानगवेही नागरी वस्तीकडे येऊ लागल्यामुळे शेतकर्यांना शेतात जाणेही मुश्किल झाले आहे.