सातारा-"आयुष्य भरात कधी रोजगार केला नाही, आता करावा लागतोय. शासन सांगते घरी रहा मग आम्ही खायचं काय ते सांगा माय बाप हो.." अशी आर्त हाक जागरण गोंधळ घालणाऱ्या लोककलावंतानी दिली आहे. मार्च महिन्यापासून केलेल्या लॉकडाऊनचा फटका लोककलावंताना देखील बसला आहे. जागरण गोंधळातून जनजागृती करणाऱ्या गोंधळी समाजाचे सर्व कार्यक्रम बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शासनाने लोककलावंताना सानुग्रह अनुदान व अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणी होत आहे.
लाॅकडाऊनच्या काळात अनेक उद्योग क्षेत्राला तसेच कृषी क्षेत्राला मोठा फाटका बसला आहे. ग्रामीण भागातील 'बारा बलुतेदार अठरा पगड जाती' मधील अनेक कुटुंब बेरोजगार होऊ लागली आहेत. लोककलेचा वारसा जपणाऱ्या व लोककला सादर करुन मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर गुजराण करणाऱ्या सर्व जाती धर्मातील हजारो लोककलावंताना देखील याचा फटका बसलाय.
मार्च २०२० पासून कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे अशा लोककलावंताचे बुकिंग झालेले कार्यक्रम रद्द झाले आहेत. काही ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी या कलावंतानी स्वत:हून कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच यापैकी अनेकांना प्रशासकीय परवानगी न मिळाल्याने त्यांनी कित्येक महिने आधीच ठरवलेले कार्यक्रम देखील रद्ध करावे लागले. या सर्वांचा परिणाम म्हणून या कलावंतावर व त्यांच्या कुटुंबियांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे.