सातारा- मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोयना धरणात 99.45 टीएमसी पाणीसाठा झाला असून एक लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या अनेक गावांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर; कृष्णा नदीकाठच्या अनेक गावांना महापुराचा धोका
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कोयना, कास, उरमोडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. खंडाळा तालुक्यातील लोहम-कन्हेरी व केसूर्डी-नायगाव पूल पाण्याखाली आले आहेत. वाई तालुक्यातील खडकी पुलाने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पुलालगत पाणी वाढले असून वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच उरमोडी नदीलगत नवीन पूल पाण्याखाली आला आहे. वाई मधील जुन्या पुलावरील अवजड वाहतूक थांबवण्यात आली आहे.
राज्य महामार्गासह प्रमुख मार्ग अनेक ठिकाणी बंद करण्यात आले आहेत. सातारा शहरालगत असणाऱ्या संगम माहुलीमध्ये पाणी शिरले आहे. तर कराडमधील यशवंतराव चव्हाण समाधी परिसर पाण्याखाली आला आहे. पाटण तालुक्यातील हेळवाक येथे रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे कराड-चिपळूण मार्ग बंद करण्यात आला आहे. पुरामुळे पाटण येथील 40 तर कराडमधील 20 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तांबवे येथील कोयना नदीवरील पूल पाण्याखाली आला असून उंब्रज-मसूर येथील कृष्णा नदीवरील पूलही पाण्याखाली आहे.