कराड (सातारा) -मटणाची विक्री करून मटण विक्री बंदीसह संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी कराडमधील चौघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात मटण, मासे विक्रीवर बंदी कायम असल्याचा आदेश आपण निर्गमित केला असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मटण विक्री करण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग टाळता यावा, या अनुषंगाने विविध उपाययोजना प्रशासनाने केल्या आहेत. सातारा जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना आणि मटण, मासे विक्रीवर बंदी असताना रविवारी साजीद चाँद शेख व विक्रम शिवाजी माने, जुनेद मुल्ला व मोबीन कुरेशी (रा. कराड) यांनी मटण विक्री करुन बंदी आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी कराड नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्याने कराड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.