कराड (सातारा) - बिअर बारला परवानगी दिल्याच्या कारणावरून कराड तालुक्यातील धावरवाडीच्या ग्रामसभेत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाला मारहाण करण्यात आली असून शासकीय मालमत्तेचे देखील नुकसान झाले आहे. मंगळवारी (6 एप्रिल) सकाळी ही घटना घडली असून रात्री उशीरा उंब्रज पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तीन तक्रार दाखल झाल्या. त्यावरून पोलिसांनी 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे धावरवाडी गावात तणावाचे वातावरण आहे.
बिअर बारच्या परवानगीवरून धावरवाडी ग्रामसभेत हाणामारी, 16 जणांवर गुन्हा दाखल - बिअर बारच्या परवानगीवरून धावरवाडी ग्रामसभेत हाणामारी
बिअर बारला परवानगी दिल्याच्या कारणावरून कराड तालुक्यातील धावरवाडीच्या ग्रामसभेत तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाला मारहाण करण्यात आली असून शासकीय मालमत्तेचे देखील नुकसान झाले आहे. या प्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुंबळ हाणामारीमुळे तणावाचे वातावरण -ग्रामसभेत झालेल्या तुंबळ हाणामारीनंतर धावरवाडी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उंब्रज पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 16 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. धावरवाडी ग्रामस्थांनी दारू दुकानाला तीव्र विरोध दर्शविला आहे. याच विषयावरून ग्रामसभेत वादाला सुरूवात झाली. वादाचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत झाले.
ऐन वेळच्या विषयावरून सुरू झाला वाद-ग्रामसभेत ऐन वेळच्या विषयावेळी बिअर बारच्या परवानगीचा मुद्दा उपस्थित झाला. मागील ठरावाद्वारे बारला परवानगी कशी काय दिली, अशी विचारणा केल्यानंतर बाचाबाची सुरू झाली. बाचाबाचीचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. लाकडी बॅट तसेच लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. ग्रामसभेतील वादाचे शुटींग करू नका, असे ग्रामसेवकांनी सांगितल्यानंतर त्यांना आणि सरपंचांना शिविगाळ, धक्काबुक्की करून इंटरनेटच्या साहित्याची मोडतोड करण्यात आली. चोरे गावातील एकास बिअर बारसाठी परवानगी दिल्याच्या मुद्यावरून धावरवाडी ग्रामसभेत हा राडा झाल्याची चर्चा संपूर्ण उंब्रज परिसरात सुरू आहे. या घटनेचा तपास उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड करत आहेत.