सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवा, खासदार श्रीनिवास पाटील यांची मागणी - military recruitment
कोरोनाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सातार्यासह अन्य ठिकाणची सैनिक भरती प्रक्रिया रखडली आहे. सरकारने या वर्षी सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी सातार्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याकडे केली आहे.
कराड (सातारा) - कोरोनाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सातार्यासह अन्य ठिकाणची सैनिक भरती प्रक्रिया रखडली आहे. तरूणांची वयोमर्यादा संपुष्टात येत असून देशसेवेची संधी हिरावली जाऊ नये. यासाठी सरकारने खास बाब म्हणून या वर्षी सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी सातार्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याकडे केली आहे.
कोरोना संसर्गाचा परिणाम सैनिक भरती प्रक्रियेवरती सुध्दा झाला आहे. गेल्या वर्षभरापासून भरती प्रक्रिया झालेली नाही. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया कोल्हापूर येथे घेण्यात येते. विशेषत: सातारा जिल्ह्याला फार मोठी सैनिकी परंपरा असून, ती परंपरा अखंडीत आहे. सातारा जिल्ह्यातून सैन्यदलात भरती होणार्या तरूणांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, सैन्य भरती प्रक्रिया वारंवार स्थगित होत असल्याने वयोमर्यादेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे खासदार पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या निदर्शनास आणून दिले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने या भरती आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक तरुणांची वयोमर्यादा संपण्याची भिती आहे. कोरानामुळे ओढवलेली परिस्थिती आणि तरूणांची संपुष्टात येणारी वयोमर्यादा लक्षात घेता सरकारने खास बाब म्हणून यावर्षी सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी खासदार पाटील यांनी केली.
हेही वाचा - पुण्यात बुधवारी २५८७ नवे कोरोनाग्रस्त