सातारा -पाटण महसूल विभागाच्यावतीने पाटण शहरात राष्ट्रीय मतदार दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, मतदार जागृत असेल तर सक्षम सरकार येवून देशाची प्रगती होते. आपल्या भारतीय लोकशाही जगात मोठी व सक्षम म्हणून गणली जाते. लोकशाहीमुळे सर्व सामान्यांना समान हक्क प्राप्त होतात. हे टिकवण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत मतदाराने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. त्यासाठीच मतदार जनजागृती दिन साजरा केला जातो, असे प्रतिपादन पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांंबे यांनी केले.
पाटण येथे महसूल विभागाच्यावतीने मतदार जनजागृती दिन साजरा करण्यात आला. यावेळी पाटणचे प्रभारी तहसीलदार समीर यादव, निवडणूक नायब तहसीलदार बजरंग चौगुले, शकील मुल्ला, पाटणचे तलाठी जे. ए. शिरोड, शिक्षक एस. एम. माळी, एस. एन. मगर, एम. डी. माळी, एस. टी. मोहीते, आर. जी. गुरव, बी. डी. लोहार, डॉ. एल. एस. भिंगारदेवे, शिक्षिका एस. डी. पाटणकर, एच. बी. रणदिवे, सी. ए. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवडणूक आयोग ही मोठी संस्था असून देशात या यंत्रणेमार्फत वेगवेगळ्या निवडणुका नि:पक्षपाती होतात. त्यामुळेच आपला लोकशाहीवर विश्वास आहे. मात्र, आज सुध्दा मतदारांच्या उदासिनतेमुळे काही ठिकाणी 60 ते 75 टक्केच मतदान होत आहे. 35 ते 40 टक्के लोक मतदान करत नाहीत. 100 टक्के मतदान झाले पाहिजे. त्यासाठी मतदार जागृती दिन साजरा केला जात असून प्रत्येक निवडणुकीत 100 टक्के मतदान करा, असे आवाहन श्रीरंग तांबे यांनी केले आहे. तसेच, प्रत्येक विद्यार्थ्याने आपली जबाबदारी म्हणून ज्यांचे 18 वर्ष पूर्ण झाले त्यांनी मतदार म्हणून नोंदणी केली पाहिजे. आपण व आपल्या घरातील लोकांना मतदान करण्यासाठी सक्ती केलीच पाहिजे. मतदान करणे हे राष्ट्रहीत व आपले कर्तव्य आहे. देशात लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. असे मत तहसीलदार समीर यादव यांनी व्यक्त केले आहे.
प्रारंभी मतदार जनजागृती दिनानिमित्त पाटण तहसील कार्यालयाच्यावतीने पथनाट्य, रांंगोळी, निबंध, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांना प्रमाणपत्र देवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तर पाटण शहरात मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. 18 वर्ष पूर्ण झालेल्या व जेष्ठ नागरीकांना मतदान ओळख पत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवतरूण मतदारांना लोकशाही प्रती निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली. यावेळी विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.