सातारा - सातारा जिल्ह्यातील दरे (ता. महाबळेश्वर) गावचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे हे राज्याचे ३० वे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्या रूपाने साताऱ्याचा चौथा सुपुत्र मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला आहे. त्यांच्या निवडीमुळे महाबळेश्वर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात चैतन्य निर्माण झाले आहे. ( CM Eknath Shinde Son of Satara District )
महाबळेश्वरचे भाग्य उजळले -महाबळेश्वर हा डोंगरी आणि दुर्गम तालुका. कोयना धरण, अभयारण्यामुळे विस्थापित व्हावे लागल्याने कामधंद्यासाठी लोकांना मुंबईची वाट धरावी लागायची. एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय देखील कामधंद्यासाठी ठाण्याला गेले आणि स्थायिक झाले. ९ फेब्रुवारी १९६४ रोजी एकनाथ शिंदे यांचा ठाणे येथे जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे, तर माध्यमिक शिक्षण मंगला हायस्कूलमध्ये झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला होता. सेना-भाजप युती आणि आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये विद खात्यांची मंत्रिपदी त्यांनी भूषवली आज ते राज्याचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याचा चौथा सुपुत्र मुख्यमंत्री पदावर विराजमान होत आहे. यानिमित्ताने महाबळेश्वर तालुक्याचे भाग्य उजळले आहे.
असा आहे राजकीय प्रवास -एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते असून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. २०१९ च्या सुरुवातीपासून त्यांनी आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (२००९, २०१४ आणि २०१९) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा (२००४) असे चार वेळा आमदार झाले.
यशवंतराव बनले संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री -कराडचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांना संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. १ मे १९६० रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. पंचायत राज व्यवस्था कृषी औद्योगिक धोरण, सहकार चळवळीचा पाया त्यांनी घातला. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच दबदबा राहिला आहे.
बॅ. बाबासाहेब भोसले वर्षभर होते मुख्यमंत्री - बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी वर्षभरातील मुख्यमंत्री पदाच्या काळात दहावीपर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक संरक्षण देणारी श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना आणि मासेमारांसाठी विमा योजना त्यांनी सुरू केली.