कराड (सातारा) - कोयना धरण परिसर शनिवारी दुपारी भूकंपाच्या दोन सौम्य धक्क्यांनी हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपांची तीव्रता 2.9 आणि 3 रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली आहे. या भूकंपामुळे धरणाला कसलाही धोका पोहोचला नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोयना धरण परिसरात भूकंपाचे दोन धक्के जाणवले. 2.9 रिश्टर स्केलचा पहिला धक्का 1.55 मिनिटांनी, तर 1.57 मिनिटांनी 3 रिश्टर स्केलचा दुसरा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे हे सौम्य धक्के कोयनानगरसह पाटण तालुक्यात जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 13 किलोमीटर अंतरावर वारणा खोर्यातील जावळे गावाच्या वायव्येला 8 किलोमीटर अंतरावर होता.
भूकंपाची खोली 7 किलोमीटर होती. पाटण तालुक्याला या भूकंपाचे हादरे बसले. भूकंपामुळे कोयनानगर अथवा पाटण तालुक्यात कोठेही पडझड झालेली नाही. तसेच कोयना धरण सुरक्षित असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.