सातारा- जिल्ह्यात दाखल झालेल्या पालखी सोहळ्याचा आज दुसरा दिवस अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला. ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर, खांद्यावर घेतलेल्या भगव्या पताका, दौडणाऱ्या अश्वावरती खिळलेल्या सगळ्यांच्या नजरा आणि अश्व येताच केलेला टाळ्यांचा गजर, अशा भारलेल्या उत्साही वातावरणात माऊलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण सातारा जिल्ह्यातील चांदोबांचा लिंब येथे पार पडले.
आषाढी वारी : चांदोबांचा लिंबमध्ये पार पडले माऊलींचे पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब या ठिकाणी दुपारी साडेतीन वाजता माऊलींच्या अश्वाचे रिंगणात आगमन झाले. नंतर अर्ध्या तासाने माऊलींची पालखी येताच पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
मानाच्या पहिल्या दिंडीपासुन या रिंगणाला सुरुवात झाली होती. ती शेवटच्या दिंडीपर्यत अश्व धावत गेले आणि मध्यवर्ती असलेल्या माऊलींच्या पालखीपुढे नतमस्तक झाले. नंतर माऊलींच्या अश्वांना प्रसाद देवून रिंगण सोहळ्याची सांगता करण्यात आली.
या ठिकाणी माऊलींचे रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नयनरम्य अशा सोहळ्याचा आनंद वारकऱ्यांनी घेतला. पालखी पुढे तरडगाव मुक्कामाकडे मार्गस्थ झाली. आज (बुधवारी) तरडगाव या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. तर गुरूवारचा मुक्काम फलटण येथे असणार आहे.