सातारा: भाविकांच्या कारने रस्त्याकडेला थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली. सातार्यातील पारगाव खंडाळा येथे बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
महिलेसह चिमुकला जागीच ठार: सातार्यातून बाळूमामाच्या मेंढरांचे दर्शन घेऊन पुण्यातील भाविक नातेवाईकांसोबत कारने पुण्याकडे निघाले होते. खंडाळा हद्दीत महामार्गाकडेला उभ्या असणार्या मालट्रकला भरधाव कारने पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातात कांचन चंद्रकांत वनशिवे, विरेंद्र चंद्रकांत वनशिवे (रा. वडगाव रासाई, ता.शिरुर, जि. पुणे), अशी मृतांची नावे आहेत. तर संकेत भिमाजी चौधरी (रा. वडगाव रासाई, ता.शिरुर जि. पुणे), स्नेहल पांडुरंग कुलते, अनिल मुक्ताराम कुलते, अंजली अनिल कुलते, परी अनिल कुलते (सर्व रा. अकोला) हे गंभीररीत्या जखमी झालेल्यांची नावे आहेत.
अपघातात कारचा चक्काचूर: पुणे जिल्ह्यातील वडगाव रासाई (ता. शिरुर) येथील वनशिवे कुटुंबीय अकोल्यातील आपल्या नातेवाईकांसोबत सातारा जिल्ह्यामध्ये असणाच्या बाळूमामांच्या दर्शनासाठी कारमधून (क्र.एम. एच.13 एन. 3154) आले होते. दर्शन घेऊन पुण्याला परत जाताना खंडाळा हद्दीत एका हॉटेलसमोर उभ्या असणार्या ट्रकला पाठीमागून भरधाव कारने धडक दिली. धडक एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. ट्रकमध्ये अडकलेला कारचा भाग क्रेनच्या मदतीने बाजूला करावा लागला. त्यानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढता आले. या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली आहे.
साताऱ्यात यापूर्वीही कारचा अपघात: कोरेगाव रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा सत्र न्यायालय दरम्यानच्या ओढ्यात कार कोसळल्याची घटना 21 ऑगस्ट, 2021 मध्ये घडली होती. यात घटनेत कोल्हापूरचे दोन जण ठार तर एक जण जखमी झाले होते. अनिकेत कुलकर्णी (वय २८, मंगळवार पेठ, कोल्हापूर) व आदित्य घाटगे (वय २३, कसबा बावडा) अशी मृतांची नावे होती. तर देवराज माळी (वय २१, कसबा बावडा) हा गंभीर जखमी झाला होता.