महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी आमदार आनंदराव पाटलांशी उपमुख्यमंत्र्यांची कमराबंद चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

पाटण तालुका दौर्‍यानिमित्त कराडमध्ये मुक्कामी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी विधान परिषदेचे माजी आमदार आनंदराव पाटील यांनी सहकार मंत्र्यांच्या निवासस्थानी कमराबंद चर्चा केली. यामुळे कराड तालुक्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधान आले आहे.

माजी आमदार आनंदराव पाटलांशी उपमुख्यमंत्र्यांची कमराबंद चर्चा
माजी आमदार आनंदराव पाटलांशी उपमुख्यमंत्र्यांची कमराबंद चर्चा

By

Published : May 16, 2022, 6:40 AM IST

कराड (सातारा) -पाटण तालुका दौर्‍यानिमित्त कराडमध्ये मुक्कामी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी विधान परिषदेचे माजी आमदार आनंदराव पाटील यांनी चर्चा केली. सहकार मंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांनी कमराबंद चर्चा केली. यामुळे कराड तालुक्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधान आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच कराड बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट झाली असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विलासकाका उंडाळकर यांच्या निधनानंतर उंडाळकर गटाला घेरण्याच्या हालचाली सध्या राष्ट्रवादीच्या सोबतीने सुरू झाल्याचेच चित्र यानिमित्ताने पुढे येत आहे.

आनंदराव पाटील दीर्घकाळ होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष -आनंदराव पाटील हे दीर्घकाळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. काँग्रेसचे माजी मंत्री दिवंगत आनंदराव चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्षा दिवंगत प्रेमलाकाकी चव्हाण यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदराव पाटील यांचा दबदबा होता. ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे केंद्रात राज्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांची सावली म्हणून आनंदराव पाटील हे वावरत असत. पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसपासून दूर गेल्यानंतर सध्या कोणत्याच पक्षाचे लेबल त्यांना नाही. सध्या ते भाजपच्या डॉ. अतुल भोसले गटाशी जवळीक साधून आहेत. तसेच राष्ट्रवादीचे आमदार तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी देखील आनंदराव पाटील यांचे चांगले सूर जुळतात. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी रविवारी सायंकाळी आनंदराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे या भेटीचे अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

पंधरा मिनिटे चर्चा -उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यात सुमारे पंधरा मिनिटे कमराबंद चर्चा झाली. तत्पुर्वी बाळासाहेब पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आनंदराव पाटलांनी त्यांचे अभिनंदन केले. या भेटीबद्दल सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच कराड बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने या भेटीमध्ये तिघांमध्ये चर्चा झाली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details