सातारा -राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे आणि त्यांची पत्नी इंदिरा घार्गे यांना न्यायालयाने मंजूर केलेला अटकपूर्व जामीन शुक्रवारी रद्द केला. न्यायालयाने दिलेली हजेरीची अट न पाळल्यामुळे हा जामीन रद्द करण्यात आला.
माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह पत्नी इंदिरा घार्गे यांच्या विरोधात अतुल शहा यांनी १७ जुलै २०१८ रोजी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती. याप्रकरणात घार्गे यांनी न्यायालयात धाव घेवून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र, मंगळवारी आणि शुक्रवारी हजेरीची अट घातली. ही अट त्यांनी न पाळल्यामुळे सरकारी पक्षाने आणि तक्रारदार शहा यांनी घार्गे यांचा जामीन रद्द करण्याचा अर्ज न्यायालयात दाखल केला. यानंतर दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून जिल्हा न्यायालयाने घार्गे पती-पत्नीचा अटकपूर्व जामीन रद्द केला, अशी माहिती अॅड.विकास पाटील-शिरगावकर यांनी दिली.