कराड (सातारा) - कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे सहा जण कोरोनामुक्त झाले. कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार केलेल्या कराड नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कोविड योद्ध्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून डिस्चार्ज देण्यात आला.
कोविडमुळे मृत्यू होणाऱ्यांवर कराडच्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करणाऱ्या कराड नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कृष्णा हॉस्पिटलने निमंत्रित केले होते.
कराड नगरपालिकेचे कर्मचारी युवराज भोसले, हणमंत लादे, सुरेश शिंदे, राजाराम सपकाळ, संजय लादे, संजय भोसले या कोविड योद्ध्यांच्या हस्ते कोरोनामुक्त रूग्णांचा सत्कार करण्यात आला. याद्वारे कृष्णा हॉस्पिटलने कोविड योद्ध्यांचा देखील सन्मान केला.
कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या रूग्णांमध्ये कराड तालुक्यातील मालखेड येथील 60 वर्षीय पुरूष, खंडोबानगर-मलकापूर येथील 30 वर्षीय पुरूष, येळगाव येथील 47 वर्षीय पुरूष, तारूख येथील 56 वर्षीय पुरूष, पाटण तालुक्यातील कराटे येथील 49 वर्षीय पुरूष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरूष, अशा सहा जणांचा समावेश आहे.
यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील यांच्यासह हॉस्पिटलचा स्टाफ उपस्थित होता.