सातारा - जिल्ह्यातील सुरू असलेल्या सातारा-पंढरपूर कामाची मुदत संपली असून देखील मुदतबाह्य काम चालू असल्याबाबत ग्राहक प्रबोधन समिती तालुका अध्यक्ष राजू मुळीक यांनी आवाज उठवला होता. याबाबत माण-खटावच्या उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी कार्यलायामध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीत या कामाची मुदत 31जुलै 2019 रोजीच संपली असल्याने ते काम बंद करावे, असे मत राजू मुळीक व किरण खरात यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी आम्ही केंद्र सरकारकडे मुदतवाढ मागितली आहे, असे सांगितले. मात्र, मुदतवाढ मिळाली नाही तरी देखील 9 महिने अनधिकृत रितीने हे काम सुरू का ठेवण्यात आले..? असे म्हणत किरण खरात यांनी पत्रव्यवहार दाखवत उपविभागीय अधिकारी यांना आपल्या उपविभागात हे काम बंद करण्यात यावे तसेच हे काम कसे सुरू ठेवण्यात आले आहे याची माहिती घ्यावी असे सांगितले. उपविभागीय अधिकारी यांनी या रस्त्याच्या कामाला कोणत्या प्रकारे परवानगी देण्यात आली आहे ते आमच्या कार्यलयाला लवकर पत्रव्यवहार करुन कळवा, असे लेखी आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना दिले आहेत.
जिल्ह्यात साडे तीन हजार वृक्ष दोन वर्षात लावण्यात येणार असल्याचे लेखी सदरच्या ठेकेदार यांनी दिले होते. मात्र, एक ही वृक्ष गेल्या तीन वर्षात लावला गेला नाही. तसेच त्यांना अटीशर्तीनुसार काम करण्यास सांगितले होते. मात्र, त्या देखील पाळल्या नसल्याचे किरण खरात यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले आहे. उपविभागीय अधिकारी यांनी तत्काळ याबाबत माहिती मागितली आहे. निढळ येथील आर.एम.सी प्लांटला परवानगी देण्यात आली नसताना देखील पुन्हा सुरू झाल्याने त्याची देखील चौकशी करण्यासाठी खटाव तहसीलदार यांना आदेश काढणार असल्याचे उपविभागीय अधिकारी जिरंगे यांनी सांगितले आहे.
सातारा ते लातूर राज्य महामार्ग कामाची मुदत 31 जुलै 2019 रोजी संपली असून फेरनिविदा झाले शिवाय ठेकेदार कंपनीस हे काम चालू करण्याचा अधिकार नाही. विहीत मुदतीमध्ये काम पूर्ण न झालेने ठेकेदार कंपनीने शासन दरबारी दंडात्मक रक्कम भरणे बंधनकारक गरजेचे आहे. तसेच याकामी माण खटाव विभागातील तोडलेली 1899 वृक्ष पुनर्लगावड करने गरजेचे आहे, असे मत किरण खरात यांनी व्यक्त केले.
खटाव तालुक्यातील निढळ येथील आर. एम.सी प्लांट ला परवानगी देण्यात आली नसताना देखील पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मागील पाच महिन्या पूर्वी या ठिकाणी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ते प्रकरण ताजे असताना पुन्हा दंडात्मक कारवाई करून देखील हा प्लांट का सुरू करण्यात आला आहे..? याची चौकशी नंतर करा मात्र आधी तो प्लांट सील करण्यात यावा, अशी मागणी राजू मुळीक यांनी केली.