सातारा - माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचे नवनिर्वाचीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा युतीच्या कार्यकर्त्यांपेक्षा काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांसोबतचा वाढता संपर्क चर्चेचा विषय ठरत आहे. खासदार भाजपचा मात्र पायघड्या आघाडीच्या अशी चर्चा मतदारसंघात रंगत आहे. निंबाळकर यांच्या विजयात काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचा मोठा हात असल्याचे मानले जाते. माण-खटावमधून निंबाळकरांना काँग्रेस आमदार गोरे यांनी उघड-उघड पाठिंबा देऊन पक्षाचा रोषही ओढावून घेतला आहे.
खासदार भाजपचे मात्र पायघड्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या, नागरिकांमध्ये चर्चा - VBA
काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आपले मित्र असणारे भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी पक्षाचा विचार न करता भव्य सभा घेत माण-खटावमध्ये घेऊन पाठिंबा दिला होता.
आमदार गोरे यांनी माण-खटावमध्ये जाहीर सभेचे आयोजन करुन निंबाळकरांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यांच्या इशाऱ्यावर काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांपासून पंचायत समिती, नगरपालिका नगराध्यक्ष आणि नगरसेवक तसेच ग्रामपंचायत सदस्यांनीही लोकसभा निवडणुकीत निंबाळकरांचे काम केले होते. याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला. निंबाळकरांना माण-खटावमधून २३ हजारांचे मताधिक्य मिळाले. या सर्व परिस्थितीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माण-खटावचा मुद्दा चर्चेने सोडवला जाईल असे म्हटले होते. परंतू आमदार गोरे यांनी पक्षाचा कोणताही मुलाहिजा न ठेवता उघडपणे निंबाळकरांचा प्रचार केला आणि त्यांना विजयापर्यंत घेऊन गेले.
नवनिर्वाचित खासदार निंबाळकर हे भाजपच्या कार्यक्रमांना जाण्याचे टाळून आमदार गोरे यांच्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. तसेच वाड्या-वस्त्यांना भेटी देत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आमदार गोरे व काँग्रेसचे पदाधिकारी दिसून येतात. भाजपचा एकही कार्यकर्ता त्यांच्यासमवेत पाहायला मिळत नाही. त्यामुळे खासदार नक्की भाजपचा की काँग्रेसचा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे.