सातारा - दीपाली चव्हाणला त्रास देऊन प्रशासकीय व्यवस्थेचा बळी ठरवू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शासन व्हावे, जेणेकरून नोकरीत प्रशासकीय जाच सहन करणाऱ्या शेकडो दीपालींचे जीव वाचतील, अशा शब्दात आपल्या भावना काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणी सदस्य रजनी पवार यांनी व्यक्त केल्या.
हेही वाचा -दीपाली चव्हाण प्रकरण: शिवकुमार आणि चव्हाण फोनवर कसे बोलायचे ते ऐका...
साताऱ्यातील निवासस्थानी शांतता
स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केलेल्या हरिसालच्या वनक्षेत्रपाल दीपाली चव्हाण (मूळ रा. सातारा) या रजनी पवार यांच्या भाची होत्या. लग्नापूर्वी काही वर्षे साताऱ्याच्या व्यंकटपुरा पेठेत राहणाऱ्या वनक्षेत्रपाल दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे साताऱ्यातील त्यांच्या 'श्रीराम सहवास' या निवासस्थानी अस्वस्थ करणारी शांतता आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरीक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून छातीवर गोळी मारून घेऊन आत्महत्या केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून हे कृत्य करत असल्याचे त्यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.
तडफेने मिळवली पोस्टिंग
चव्हाण कुटुंब हे मूळचे बीड जिल्ह्यातील. दीपालीचे वडील दापोली येथे कृषी विद्यापीठात अधिकारी पदावर नोकरीस होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काही महिन्यांतच दीपालीच्या भावाचे कर्करोगाने निधन झाले. त्यामुळे हे कुटुंब भावनिकदृष्ट्या खचले होते. दीपाली आईसह साताऱ्यात व्यंकटपुरा पेठेतील बहिणीच्या घराजवळ स्थायिक झाली. येथे त्यांचा फ्लॅटही आहे. साताऱ्यातच तिने तडफेने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून वनविभागात पोस्टिंग मिळवली. २०१४मध्ये धुळघाट रेल्वे येथे तिला पहिली पोस्टिंग मिळाली.